अमरावतीत ११ शिकवणी वर्गांना लावले सिल

    दिनांक :12-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
अमरावती,
अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे शहरातल्या अकरा शिकवणी वर्गाला बुधवारी मनपाच्या पथकाने धडक कारवाई करत सिल ठोकले. या कारवाईमुळे बेभान झालेल्या शिकवणी वर्ग संचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 
 
 
सुरत येथील शिकवणी वर्गाला आग लागल्यामुळे विद्यार्थांचा मृत्यू झाला होता. ही घटना डोळ्यासमोर ठेऊन अमरावती शहरातल्या शिकवणी वर्ग संचालकांना अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी मनपाने त्यांना पुरेसा अवधी सुद्धा दिला होता. इतके होऊनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत न करणार्‍या शिकवणी वर्ग संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त निपाणे यांनी दिले होते.
 
त्या आदेशानुसार बुधवारी अग्निशमन यंत्रणा नसणार्‍या साई कोचिंग क्लासेस, सिव्हील इंजिनिअरींग कॅड सेंटर, मेंटॉर, सी.ए.डी.डी. सेंटर, सी.सी.आय.टी., गुरुकुल शिकवणी वर्ग, उडान सायंन्स अ‍ॅकॅडमी, आकाश शिकवणी वर्ग, राजेश येवले शिकवणी वर्ग, राठी सर शिकवणी वर्ग, भोजने सर शिकवणी वर्ग यांच्यावर कारवाई करण्यात आली. नियमानुसार अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांच्या शिकवणी वर्गाची इमारत सिल करण्यात आली. महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय सदर सिल उघडल्यास संबंधिता विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार संबंधित प्रतिष्ठाणावर सिलची कार्यवाही करण्यात आली.
 
याआधी संबंधित प्रतिष्ठाणांना नोटीसेस देण्यात आल्या होत्या. परंतु संबंधितांनी अग्निशमन यंत्र बसविल्याचे निदर्शनास आले नसल्याने सदर शिकवणी वर्गात शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेसाठी सदर शिकवणी वर्ग सिल करण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये सहाय्यक आयुक्त मुख्यालय योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त बाजार व परवाना श्रीकांत चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, सुनील पकडे, अग्निशमन विभागाचे कृतीदल प्रमुख संतोष केंद्रे, सदस्य अमित दडगाल, गौरव दंदे, गोविंद घुले, बाजार व परवाना विभागाचे निरीक्षक उदय चव्हाण, अमर सिरवाणी, रुपेश गोलाईत, प्रदिप झंझाळ, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.