मदरशांमध्ये गोडसे, प्रज्ञासिंह जन्माला येत नाहीत : आझम खान

    दिनांक :12-Jun-2019
रामपूर, 
मदरशांमध्ये नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर जन्माला येत नाही, अशी बडबड समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे. देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले आहे. नथुरामच्या विचारांचा प्रचार करणारे लोकशाहीचे शत्रू आहेत, हे प्रथम लोकांना सांगायला हवे. जे दहशतवादी घटनांमधील आरोपी आहेत, त्यांना सन्मान देणे गैर आहे, असेही ते म्हणाले. 
 
 
केंद्र सरकारला जर खरेच मदरशांना मदत करायची असेल, तर त्याने मदरशांमध्ये सुधारणा घडवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते. इथे इंग्रजी, हिंदी आणि गणित विषयही शिकवले जातात. मदरशांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी सरकार मदत करू शकते. सरकारने मदरशांसाठी इमारती, फर्निचर आणि मध्यान्ह भोजनासारखे प्रयोग राबवायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.