नक्षलवाद्यांनी जाळला नऊ कोटींचा तेंदुपत्ता

    दिनांक :12-Jun-2019
-छत्तीसगडमध्ये हैदोस
गारियाबंद,
गारियाबंद जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये ठेवलेला नऊ कोटी रुपयांच्या तेंदुपत्त्याच्या साठ्याला नक्षलवाद्यांनी आग लावल्याची माहिती अधिकर्‍यांनी आज बुधवारी दिली. नवामुंडा गावात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी हैदोस घातल्याची माहिती विभागीय वनअधिकारी जे. आर. भगत यांनी दिली.
 
 
 
महिला नक्षलवाद्यांचा समावेश असलेल्या 12 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री तीन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतल्यावर वनविभागाच्या तीन गोदामांना आग लावली. या गोदामांत 1700 पोती तेंदुपत्ता ठेवला होता, असे त्यांनी सांगितले. कंत्राटदाराच्या मालकीच्या हा संपूर्ण साठा नक्षलवाद्यांनी जाळला आहे. गोदामांना आग लावल्यावर नक्षलवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या सुरक्षा रक्षकांना एका खोलीत डांबून घटनास्थळावरून पळ काढला.
 
नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन विभागाला पाचारण केले. गोदामांमधील आग अद्यापही धुमसत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. तेंदुपत्ता संकलनाची संपूर्ण मजुरी मजुरांना मिळत नसल्याने हे कृत्य केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी मागे सोडलेल्या पत्रकात केला आहे. या गुन्ह्यात गुंतलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.