अफरातफरीच प्रकरण; पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष झरदारींना १० दिवसांची कोठडी

    दिनांक :12-Jun-2019
इस्लामाबाद,
आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींना पुढील 10 दिवस पोलिस कोठडीत घालवावे लागणार आहेत. राष्ट्रीय उत्तरदायित्त्व विभागाच्या (एनएबी) अधिकार्‍यांनी झरदारींना मंगळवारी स्थानिक न्यायालयापुढे हजर केले होते. या वेळी तपास यंत्रणेच्या वतीने झरदारींच्या पोलिस कोठडीसाठी विनंती करण्यात आली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

 
 
झरदारी यांनी आर्थिक अफरातफरीचा आरोप होताच, अटकेच्या भीतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावताच पोलिसांच्या सोबत एनएबीच्या पथकाने झरदारींना अटक केली. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तत्पूर्वी, तीन डॉक्टरांच्या पथकाने झरदारी यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर एनएबीची बाजू ऐकून घेत, न्यायालयाने झरदारींची दहा दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली.
 
आर्थिक अफरातफर प्रकरणात झरदारी व त्यांची बहीण फरयाल हे दोघे मु‘य आरोपी असून, त्यांनी पाकिस्तानबाहेर पैसे पाठविण्यासाठी बनावट बँक खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. या माध्यमातून दोघांनी 15 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.