पुणे पोलिसांचा रांचीतील स्टेन स्वामीच्या घरावर छापा

    दिनांक :12-Jun-2019
- शहरी नक्षलवाद प्रकरण
पुणे,
झारखंडमधील रांची येथील तथाकथित सामाजिक कार्यकर्ता फादर स्टेन स्वामीच्या घरावर आज बुधवारी पुणे पोलिसांनी छापेमारी करीत इलेक्ट्रॉनिक उपकरणासह काही वस्तू जप्त केल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. 

 
 
एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवादाबाबत यापूर्वी अटक केलेल्या नऊ नक्षलवादी नेत्यांशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
स्वामीला आतापर्यंत ताब्यात घेतलेले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुणे पोलिसांनी देशभरात केलेल्या छापेमारीदरम्यान स्वामीच्या निवासस्थानावर छापे घालून काही वस्तू जप्त केल्या होत्या. पुणे जिल्ह्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी निधी पुरवल्याचा आरोप आहे.
 
एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी नेत्यांनी केलेल्या भडकाऊ भाषणामुळे दुसर्‍या दिवशी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार उसळला होता, असा आरोप पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुधीर ढवळे, शोमा सेन, सुरेंद्र गडिंलग, महेश राऊत, रोना विल्सन, वरवरा राव, अर्जुन परेरा, सुधा भारद्वाज आणि वर्नन गोन्सालवीस यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.