पाकच्या संरक्षण खर्चात बदल नाही

    दिनांक :12-Jun-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानने मंगळवारी 2019-2020चा अर्थसंकल्प मांडला. यावेळी संरक्षण विभागाच्या खर्चात कोणताही बदल करण्यात आला नाही. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने 1 हजार 150 अब्ज रुपयांची लष्कराची तरतूद कायम ठेवली आहे. 
 
 
लष्करी खर्चात कपात करण्याची घोषणा पाकिस्तानच्या लष्कराने नुकतीच केली होती. महसूल राज्यमंत्री हमद अजहर यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प मांडला. सात हजार अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प मांडताना संरक्षण विभागासाठी असलेली तरतूद कायम ठेवली आहे. मात्र, यामुळे लष्कराच्या सज्जतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अजहर म्हणाले.
 
पंतप्रधान इम्रान खान यांनीही लष्करी खर्चात कपात करण्याची घोषणा केली होती. लष्कराने स्वत:हून खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी ईदच्या काळात सांगितले होते. मागील वर्षी म्हणजे 2018मध्ये पाकिस्तान हा लष्करावर सर्वाधिक खर्च करणार्‍या देशांच्या यादीत 20व्या क्रमांकावर होता.
 
दरम्यान, पाकिस्तानचा विकासदर हा चार टक्के राहील, अशी अपेक्षा असून, गेल्या वर्षीपेक्षा 30 टक्के अधिक अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. कर्तारपूर कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादन आणि पायाभूत सोयींसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.