विजयाचा शिल्पकार

    दिनांक :12-Jun-2019
थर्ड ओपिनियन...
महेंद्र आकांत 
 
तो दिवस होता २०११ सालातील २ एप्रिल... या दिवशी एक इतिहास घडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा पराभव करून दुसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या दिवशी काही बाबी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. एक म्हणजे पहिल्यांदा यजमान संघाला क्रिकेट स्पर्धेतील विश्वचषक जिंकता आला आणि पहिल्यांदा आशिया खंडातील दोन्ही संघ, तेही संयुक्त यजमान संघ अंतिम सामन्यात एकमेकांच्या विरोधात झुंजले होते. त्या दिवशी आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण बाब घडली, ती म्हणजे आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि स्वभावाने लोकांची मने जिंकून घेणारा युवराज सिंह स्पर्धेचा स्पर्धावीर ठरला होता. मला आजही तो दिवस आठवतो. कारण, त्या दिवशी मी या सामन्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो. अंतिम सामना आटोपल्यावर वानखेडे स्टेडियममधील आणि बाहेरील संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे होते. 

 
 
सामना आटोपल्यानंतर होणार्‍या पत्रपरिषदेबाबत प्रत्येक भारतीय पत्रकाराला उत्सुकता होती. मीडिया सेंटरच्या खालील पत्रपरिषदेचा कक्ष खचाखच भरला होता. एवढेच नव्हे तर बसायला जागा नसल्यामुळे काही पत्रकार आजूबाजू उभे होते आणि काही पत्रकार खाली बसले होते. अचानक विजयाचे शिल्पकार ठरलेले महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंह तेथे आले. त्यापैकी युवराजने जल्लोषा बधाई... हो भाई... अशा शब्दात सार्‍यांना विजयाचा शुभेच्छा दिल्या, उपस्थित पत्रकारांनीही त्याला व धोनीला शुभेच्छा दिल्या. पहिले पाच-दहा मिनिटे शुभेच्छामध्ये गेली होती. त्या दिवशी युवराजचा उत्साह निश्चित वाखाणण्याजोगा आणि लक्षात राहण्यासारखा होता.
 
अशा या युवराजने त्या वर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी बजावून स्पर्धावीराचा मान मिळविला होता. अंतिम सामन्याचा सामनावीर धोनी (नाबाद 91) ठरला असला तरी त्याला विजय खेचून आणण्यासाठी युवराज सिंगने (नाबाद 21) पाचव्या गड्यासाठी नाबाद 54 धावांची समर्थ साथ दिली होती. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेत युवराजने एका शतकासह चार अर्धशतकांची नोंद केली होती आणि काही सामन्यांमध्ये गोलंदाजीतही धमाल उडवून देत आपल्या अष्टपैलूत्वाचे प्रदर्शन केले होते. त्यातही अर्धशतक धावा काढताना तो तीन वेळा नाबाद राहिला होता.
 
2003 सालापासून विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या युवराजला 2011 च्या त्यांच्या जीवनातील संस्मरणीय विश्वचषक स्पर्धेनंतर कर्करोगाने उसळी मारली आणि त्याचे आयुष्यच बदलून टाकले. वडील योगराज सिंह यांच्याकडून क्रिकेटचे बाळकडू मिळाल्यानंतर त्याच्या आईने त्याला क्रिकेट कारकीर्दीप्रमाणेच त्यांच्या जीवनातील कठीणप्रसंगी म्हणजे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेदरम्यान चांगली साथ दिली आणि त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी उभे केले. मात्र, पहिलेसारखा प्रभाव तो पाडू शकला नाही. सहा चेंडूंवर सहा षटकार हाणणार्‍या आपला लाडका मित्र युवराजला धोनीने याही काळात संधी दिली. मधल्या काळात का कोण जाणे दोन्ही मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला. युवराजही नवनवीन चेहरे समोर येऊ लागल्यामुळे बाजूला सारला गेला. 2011 सालची दहावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजविणार्‍या युवराजने संधीसाधून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुरू असताना संपूर्ण क्रिकेटला राम राम ठोकला.
 
आपल्या संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कारकीर्दीत फलंदाज म्हणून 23 सामन्यांमध्ये 21 डाव खेळणार्‍या डावखोर्‍या युवराजने सात वेळा नाबाद राहण्याचा मान मिळविला आणि एकूण 738 धावा गोळा केल्या. यात त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसं‘या होती 113. ही शतकी धावसंख्या त्याने 2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजसारख्या वेगवान गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखल्या जाणार्‍या संघाविरुद्ध नोंदविली होती. या एका शतकासह विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नावे सात अर्धशतकांची नोंद आहे. याशिवाय त्याने संपूर्ण कारकीर्दीत 68 चौकार आणि 13 षटकार हाणले आहेत. शिवाय चार झेल घेऊन फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला आहे.
 
एवढेच नव्हे तर गोलंदाजीतही त्यांनी आपल्या प्रभावी कामगिरीची नोंद केली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कारकीर्दीत 14 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 92.3 षटकांची गोलंदाजी केली, चार षटके निर्धाव टाकली आणि 462 धावा देत एकूण 20 फलंदाज बाद केले. यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्याने 2011 सालीच आयर्लंड संघाविरुद्ध नोंदविली होती. त्याने या सामन्यात दहा षटकांचा कोटा पूर्ण करीत एकही निर्धाव षटक न टाकता 31 धावा दिल्या होत्या आणि पाच फलंदाज बाद केले होते. म्हणजे त्याने अर्धा डाव एकट्यानेच गारद केला होता. अशा या संघर्षपूर्ण जीवन जगणार्‍या युवराजची निवृत्ती सार्‍यांनाच चटका लावून गेली.