‘बिग बॉस मराठी’च्या घरात हस्‍तरेखा वाचण्‍याचे नवे खुळ

    दिनांक :12-Jun-2019
‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात नवनवीन टास्क रंगत आहेत आणि जो तो आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात एक वेगळंच खुळ पाहायला मिळतंय. घरातील स्पर्धक एकमेकांच्या भविष्याचा अंदाज करण्यात व्यस्त आहेत. वूटच्‍या ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले हा शिव ठाकरे व वैशाली म्‍हाडेसोबत बसला आहे. अभिजीत हस्तरेखा वाचून भविष्य सांगता येत असल्याचा दावा करतो. हे ऐकून शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेला त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो.
शिवची हस्तरेखा वाचत बिचुकले म्हणतो, ‘तुला पैसा खूप आवडतो आणि पोरींचा पण खूप नाद आहे तुला. हे तू दाखवत नाहीस,’ आणि पुढे विचारतो, ‘तू पोलीस किंवा सैन्यात जायचा विचार केला होतास ना?’ शिव या अंदाजाला नकार देतो आणि म्‍हणतो, ‘नाही, तुम्‍ही कुठच्‍या कुठे जुळवू नका.’ यामुळे तिघेही हसू लागतात. बिचुकले पुढे म्‍हणतो, ‘डान्‍स, दिग्दर्शन क्षेत्रात काम कर त्‍यात भविष्‍य आहे तुझं.’

हस्‍तरेखा वाचण्‍याचे सत्र येथेच थांबत नाही. शिव वीणाकडे जातो. ती नेल कलरने तिचे सिपर रंगवण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त होती. शिव तिला विचारतो, ‘लहानपणी कधी डोक्‍यावर पडलेलीस का?’ आणि वीणा त्‍याला हो म्‍हणून प्रत्‍युत्‍तर देते. शिव तिला आणखी चिडवत म्‍हणतो, ‘तिथेच सगळा प्रोब्‍लेम झाला आहे आणि तुला बिग बॉस हाऊसमध्‍ये क्‍यूट आणि हँडसम मुलगा भेटला आहे का?’ तो स्‍वत:बद्दलच बोलत असतो, पण वीणा ते कळत नाही असे दाखवते आणि त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष करते.घरातील हे नवीन प्रेम त्रिकूट आहे की, हस्‍तरेखा वाचण्‍याचे बनावटी खुळ आहे हे मात्र स्पर्धकांनाच ठाऊक.