रणवीर-दीपिका साकारणार ऑनस्क्रीन पती-पत्नी

    दिनांक :12-Jun-2019
मुंबई:
रणवीर सिंग आणि दीपिका पडुकोण यांना पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ही बहुचर्चित जोडी '८३' या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. खऱ्या आयुष्यात एकमेकांशी लग्नगाठ बांधलेले हे दोघंही कलाकार आता ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत.

 
 
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर आधारित '८३' हा चरित्रपट आहे. या चरित्रपटात ही जोडी पती-पत्नी म्हणूनच दिसणार आहे. रणवीर या सिनेमात कपिल देव यांच्या भूमिकेत असून, दीपिका त्यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय. याबाबत बोलताना दीपिका म्हणाली की, 'कबीर खान यांनी मला ही भूमिका साकारायला सांगितली याबद्दल मला आनंद आहे. काही महिन्यांपूर्वीच हे ठरले होते, मात्र मी छपाकच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने आम्ही त्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मी या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करेन' असंही ती म्हणाली. या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं असून, 'चक दे इंडिया'चे दिग्दर्शक कबीर खान '८३' दिग्दर्शित करत आहेत.