अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

    दिनांक :12-Jun-2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अमोल कोल्हे त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले होते. येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु या चर्चांना पूर्णविराम देत आपण राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
 
 
लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा परिणाम जाणवला. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर त्यांची भेट घेतली असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट झाली असून त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत कोल्हे जायंट किलर ठरले होते. शिवाजीराव आढळराव पाटील हे यापूर्वी तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, कोल्हे यांनी त्यांचा 58,483 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.
अमोल कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 मते मिळाले होती. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5 लाख 75 हजार 279 मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.