एएन-32 चा शोध घेण्यासाठी पथक अपघातस्थळी

    दिनांक :12-Jun-2019
-वायुदल, लष्कर आणि गिर्यारोहकांचा समावेश
नवी दिल्ली,
अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात कोसळलेल्या वायुदलाच्या एएन-32 मालवाहू विमानातील वायुदलाचे कर्मचारी बचावल्याची शक्यता गृहीत धरून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय वायुदल, लष्कर आणि गिर्यारोहक सहभागी झाले आहेत. एएन-32 विमान एका डोंगरावर कोसळले. ढगांमुळे दृष्यता कमी असल्याने ते कोसळले असावे. विमानाच्या अवशेषाची छायाचित्रे समोर आली असून, यामध्ये ते डोंगर ओलांडण्याच्या स्थिती असतानाच कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ढगांमुळे दृष्यता नसल्याने हे विमान डोंगरावर धडकले असावे, अशी शक्यता वायुदलाने वर्तवली आहे.
 

 
 
वायुदलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरला मंगळवारी सियांग जिल्ह्यातल्या पयूम येथील अत्यंत दुर्गम भागात एएन-32 विमानाचे अवशेष आढळले होते. बचावपथकामध्ये वायुदल, लष्कर आणि गिर्यारोहकांना सहभागी करण्यात आले असून, त्यांना अपघातस्थळावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उतरवण्यात आले, अशी माहिती भारतीय वायुदलाच्या प्रवक्त्याने दिली. हे बचावपथक अपघातातून कुणी वाचले का, याचा शोध घेणार असल्याची माहिती वायुदलाच्या एका अधिकार्‍याने दिली आहे. हे पथक आज सकाळी रवाना करण्यात आले आहे. अत्याधुुनिक हलके आणि एमआय-17 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध व बचाव मोहिमेतील आठ ते दहा सदस्यांना घटनास्थळी उतरवण्यात यश आले आहे. या पथकातील सदस्य परिसरातील विमानाचे अवशेष आणि विमानातील वायुदलाच्या कर्मचार्‍यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती वायुदलाच्या अधिकार्‍यांनी दिली. या मोहिमेत 15 सदस्यांचा समावेश आहे. यापैकी नऊ जण वायुदलाच्या गिर्यारोहण चमूतील सदस्य, तीन जण लष्करी, तर दोन नागरी गिर्यारोहक आहेत.
 
एमआय-17 व्ही आणि चीता हेलिकॉप्टरने एएन-32 चे अवशेष मंगळवारी शोधून काढले. पण, उंचावरील प्रदेश आणि घनदाट जंगल भागामुळे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरवणे शक्य झाले नाही. 12 हजार फूट उंचीवर लिपो या लहानशा गावाजवळ हे अवशेष आढळले असून, त्या गावाची लोकसंख्या फक्त 120 आहे. एएन-32 विमान शोधमोहिमेतील पथकाने सलग आठ दिवस केलेल्या अविश्रांत मेहनतीबद्दल एअर मार्शल आर. डी. माथूर, पूर्वेतील वायुतळाचे एअर ऑफिसर-कमांिंडग-इन-चीफ यांनी शोधपथकाचे कौतुक केले आहे, असेही वायुदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.