...तरीही मोदी टाळणार पाकिस्तानची हवाई हद्द

    दिनांक :12-Jun-2019
नवी दिल्ली,
किर्गीझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानने हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी दिली असली, तरी देखील पाकिस्तान मार्गे न जाण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. पाकिस्तानची हवाई हद्द टाळून पंतप्रधान ओमान, इराण आणि मध्य आशिया अशा लांब पल्ल्याच्या मार्गाने बिश्केकला पोहोचणार आहेत. बिश्केकमधील एससीओ संमेलन येत्या १३ आणि १४ जून असे दोन दिवस होत आहे.

 
 
भारताने पाकिस्तानकडे पंतप्रधानांच्या बिश्केकच्या प्रवासासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी मागितली होती. पाकिस्तानने कालच ( मंगळवार) ही परवानगी दिली होती. मात्र, आता पंतप्रधानांचा प्रवास पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून न होता तो ओमान, इराण आणि मध्य आशियाच्या हवाई हद्दीतून होईल, अशी माहि्ती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांनी पंतप्रधानांच्या हवाई प्रवासाबाबत विचारल्यानंतर रवीश कुमार यांनी ही माहिती दिली.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील या संमेलनात सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी आजच (बुधवार) बिश्केकसाठी रवाना होत आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि पाक पंतप्रआन इम्रान खान यांच्यात कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख असणारे पत्र पंतप्रधान मोदी यांना नुकतेच पाठवले आहे. मात्र, दहशतवाद आणि चर्चा एका वेळी होऊ शकत नाही, या भूमिकेवर भारत आजही ठाम आहे.