#ICCWorldCup2019 : एकेकाळी पाकचा संघ भारतापेक्षा मजबूत होता : कपिलदेव

    दिनांक :12-Jun-2019
नवी दिल्ली, 
एकेकाळी पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा मजबूत होता, परंतु आता भारतीय संघ विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. आगामी पाकिस्तानविरुद्धचा सामनासुद्धा भारतच जिंकेल. विश्वचषकात आतापर्यंत भारत पाकिस्तानकडून कधीच कोणताही सामना हरला नाही आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या विजयाचा विक्रम कायम राखण्यात यशस्वी होईल, असा विश्वास 1983 सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिलदेव याने व्यक्त केला. 

 
 
गत दहा वर्षात आमच्या क्रिकेटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. आज भारतीय संघ बहारदार खेळाचे प्रदर्शन करत आहे.क्षेत्ररक्षण, विकेटदरम्यान धावा काढणे आणि वेगवान गोलंदाज प्रत्येक विभागात आमचे प्रदर्शन सरस झाले आहे. यापुढेही असाच सरस खेळ कायम ठेवतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
 
विश्वचषकातील भारताच्या दमदार सुरुवातवर कपिलदेव अतिशय प्रभावित झाला आहे. त्याने आशा व्यक्त केली की, भारतीय संघ अखेरपर्यंत हे प्रदर्शन कायम राखेल. पहिल्या दोन सामन्याताल विजयाने आपण खूश असून भारतीय संघाने असेच खेळत राहो व बस्स फक्त पाऊस न पडो, असेही तो म्हणाला.
 
शिखरच्या जागी येणारा खेळाडूही उत्कृष्ट प्रदर्शन करेल
शिखर धवनच्या दुखापतीबाबत बोलताना कपिल देव म्हणाला की, संघात शिखरच्या जागी येणारा खेळाडू त्याच्यापेक्षा उत्कृष्ट प्रदर्शन करेल. मी कधी नकारात्मक विचार करत नाही व कुणी असा विचार करायलासुद्धा नको. एखादा खेळाडू नसेल तर आपण उत्कृष्ट कामगिरी करू शकणार नाही. सकारात्मक विचार करा. धवनच्या जागी येणारा खेळाडूसुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो.
 
हार्दिक पांड्याची प्रशंसा
हार्दिक पांड्या हा भारतीय संघासाठी समर्पित खेळाडू आहे. संघाप्रती समर्पणाची भावना आवश्क आहे, अशा शब्दात कपिलने पांड्याची प्रशंसा केली. कुणी त्याची तुलना करू नये. तो माझ्यापेक्षाही उत्कृष्ट खेळो, हेच मी इच्छितो. त्याच्यामध्ये इतकी क्षमता आहे की, जर तो गत सामन्याप्रमाणे खेळत राहिला तर तुम्हाला त्याची माझ्यासोबत तुलना करण्याची गरजसुद्धा भासणार नाही.