वैमानिकरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी यशस्वी

    दिनांक :12-Jun-2019
बालासोर,
भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करीत विकसित केलेल्या आवाजापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करणार्‍या पहिल्या वैमानिकरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी आज बुधवारी ओडिशाच्या तटवर्ती भागात यशस्वी झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. आवाजापेक्षा जास्त वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी भारताने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात हे विमान अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
 
 
बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावर सकाळी 11.25 वाजताच्या सुमारास संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ही चाचणी घेतली, अशी माहिती डीआरडीओच्या सूत्रांनी दिली. एका नव्या तंत्रज्ञानाची चाचणी आज घेण्यात आली. रडारच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही चाचणी यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
 
एचएसटीडीव्ही (हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल) या विशेष प्रकल्पांतर्गत आवाजापेक्षा जास्त वेगाने उडणार्‍या या वैमानिकरहित प्रदर्शनीय स्क्रॅमजेटची चाचणी घेण्यात आली. डीआरडीओच्या एचएसटीडीव्ही विशेष कार्यक्रमांतर्गत स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचा कमी वेळेसाठी म्हणजेच 20 सेकंदांपर्यंत वापर करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. स्क्रॅमजेटची चाचणी यशस्वी झाल्याने भारताचा हे तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांमध्ये समावेश झाला आहे. अत्यल्प खर्चात उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.