ठाणेदाराचा एसीबी कर्मचाऱ्यावर गोळीबार

    दिनांक :12-Jun-2019
- एसीबीच्या कारवाईच्या धास्तीने केला गोळीबार
 
 
तभा ऑनलाईन टीम 
अकोला,
पिंजर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर याने लाच प्रकरणात होणार्‍या कारवाईच्या धास्तीने आज एसीबी पथकातील सचिन धात्रक या कर्मचार्‍यावर गोळी झाडल्याने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, एसीबीच्या पथकाने नंदकिशोर नागलकर याला ताब्यात घेतले असून त्याची कसुन चौकशी सुरु केली आहे. एसीबीचे अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकांत घिवरे यांनी अकोल्यात भेट देत घटनेचा आढावा घेतला. तर जखमी झालेल्या धात्रक यांच्या तब्येतची विचारपुस केली.
 
 
लाच घेताना जाळ्यात अडकल्यानंतर अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कर्मचार्‍यावर गोळी झाडली. या घटनेत एसीबीचे कर्मचारी सचिन धात्रक यांच्या पहिले हाताला व मग पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. सचिन धात्रक यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पिंजर येथे घटनास्थळाला भेट दिली आहे. पिंजर येथे कारवाईसाठी गेलेल्या पथकात एसीबीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्म मळघने, पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी कारवाई केली.
 
दरम्यान, या घटनेनंतर अकोला पोलिस कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पिंजर येथे भेट दिली.
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर गोळीबार ?
नागलकर यांच्यावर एसीबीच्या कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर त्यांनी पिंजर येथील पोलिस ठाण्यात सर्व्हिस रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या टाकल्या. एसीबी कारवाईच्या नैराश्यातून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यांच्या प्रयत्नातून त्यांचा बचाव करण्यासाठी एसीबी कर्मचार्‍यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याच झटापटीच्या प्रयत्नात नागलकर यांच्या कडून गोळीबार झाला यात एसीबी कर्मचारी सचिन धात्रक यांच्या हाताच्या बोटांना गोळीने घरसटत ती पायाला लागली.
अमरावती एसीबीच्या ताब्यात वाहतुक शिपाई
अमरावती येथील एसीबीने आज सायंकाळी केलेल्या कारवाई बोरगाव मंजु येथील शशिकांत पाटील याला सातशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. त्याच्यावर बोरगावमंजुर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.