कारंजा तालुक्यात ७० हजार ४२४ हेक्टरवर खरीपाचे नियोजन

    दिनांक :13-Jun-2019
तालुका कृषी अधिकारी वाळके यांची माहिती
 
कारंजा लाड: तीन महिन्यांच्या प्रखर उन्हानंतर पावसासाठी शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असतांनाच कांरजा तालुक्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परंतु, हा पाऊस अत्यल्प असल्याने पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कांरजा तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले आहे.
 
 
 
कांरजा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात 70 हजार 424 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता लागणााया 3 हजार 500 क्विंटल सोयाबीन व 50 हजार पॅकेट कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात 47 हजार हेक्टरवर सोयाबीन , 10 हजार हेक्टरवर कपाशी तर उर्वरित क्षेत्रावर मुंग, उडीद, तूर व ज्वारी अशा पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. याकरिता 12 हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची आवश्यकता असून, आवश्यकतेनुसार खतही तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात खते व बियाण्याची टंचाई भासणार नाही. शेतकायांनी बियाणे व खते खरेदी करतांना पक्के बिल घेऊन त्यावर बियाण्याचा लॉट नंबर, कंपनीचे नाव व एक्सपायरी डेट, हे सर्व तपासून घ्यावे. तसेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी 70 ते 80 मि मि. पाऊस झाल्याशिवाय अथवा जमिनीत 6 इंच ओल असल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वाळके यांनी केले आहे.