बिग बींनी वापरलेली मर्सिडीज OLX वर विक्रीला

    दिनांक :13-Jun-2019
अमिताभ बच्चन यांना महागड्या गाड्या वापरण्याचा शौक आहे. त्यांनी एकेकाळी वापरलेली मर्सिडीज बेंझ एस क्लास लक्झरी कार आता विक्रीस निघाली आहे. ओएलएक्स या साइटवर ही कार विक्रीला असल्याचं पाहायला मिळत आहे. साइटवर या गाडीची किंमत केवळ ९.९९ लाख रुपये लावण्यात आली आहे.
 
 
ओएलएक्स साइटवर वापरलेल्या जुन्या वस्तू किंवा गाड्या विकल्या जाऊ शकतात. साइटवर बिग बींनी वापरलेल्या मर्सिडीजची किंमत इतकी कमी असल्याचं कारण म्हणजे याआधी ती इतरांनीही वापरली आहे. सध्या ज्या व्यक्तीने ओएलएक्सवर जाहिरात टाकली आहे, तो या गाडीचा तिसरा मालक आहे. त्या मालकानेच ही गाडी बिग बींनी वापरलेली असल्याचा दावा केला आहे. गाडीचा रंग व नोंदणी क्रमांक तोच असल्यामुळे शंकेला वाव कमी आहे. तरीही या पोस्टमधील तथ्य व सत्यता पडताळता आलेली नाही.
बिग बींनी रेंज रोव्हर, लेक्सस एलएक्स ५७०, बेंटली काँटिनेंटल जीटी यांसारख्या आलिशान गाड्या वापरल्या आहेत. ओएलएक्सवर सध्या विक्रीला असलेली ही मर्सिडीज एकेकाळी त्यांच्या ताफ्यात असल्याचा दावा मालकाने केला आहे. त्यामुळे बिग बींनी वापरलेली गाडी विकत घेणं म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल.