शॉर्टसर्किटमुळे गोठा जळून खाक

    दिनांक :13-Jun-2019
गिरड: परीसरातील रासा शिवारात रात्रीच्या सूमारास अंकुश जुनघरे या शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे शेती साहित्य जळून खाक झाले. नागरिकांच्या सर्तकतेने या आगीतून दोन बैल एक गाय थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी १३ तारखेला रात्रीच्या सूमारात घडली.

 
 
या अचानक लागलेल्या आगीने शेतकरी अंकुश जूनघरे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. खरीपा हंगामासाठी शेतकऱ्याने बियाणे,रासायनिक खताची खरेदी करून या गोठ्यात साठवून करून ठेवली होती. याशिवाय ओलिताचे शंभर पाईप,दोन मोटारी,वखर,नांगर, जनावराची वैरण आदि साहित्याची राखरांगोळी झाल्याने ऐन शेतीच्या खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. 
आधीच दुष्काळाने हवालदिल झालेल्या शेतकरी अंकुश जुनघरे याने शेतीसाठी इकडुन तिकडुन पैशाची जुळवाजुळव करून  बि-बियाणे आणि रासायनिक खतांची खरेदी करून साठवून करून ठेवली होती. मात्र अचानक मध्य रात्री गोठ्याला लागलेल्या आगीने त्याचे स्वप्न धुळीस मिळविल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. आता शेती करायची तर कशी या विवंचनेत शेतकरी अंकुश पडला आहे. या घटनेची नोंद गिरड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी अंकुश जूनघरे यांनी केली आहे.