पाऊस आणि दुखापत

    दिनांक :13-Jun-2019
थर्ड ओपिनियन...
मिलिंद महाजन
दुधात मिठाचा खडा पडावा, तसे यंदाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे झाले आहे. एकीकडे विश्वचषकाचे सामने रंगात येत असतानाच पावसाने शितलहरीसह धिंगाणा घालायला सुरुवात केली. पाऊस तसा चांगला असतो, सर्वांनाच हवाहवासा असतो, परंतु विश्वचषकादरम्यान तरी नको रे बाब असे म्हणावेसे वाटते. या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने नाणेफेक न करता, एकही चेंडू न खेळता रद्द करावे लागले, तर एका सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणला, मात्र नंतर थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यांच्या षटकांची मर्यादा कमी करून खेळविण्यात आला.पाकिस्तान व श्रीलंका सामना, वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका तसेच मंगळवारी बांगलादेश व श्रीलंका यांच्यादरम्यानचे पावसामुळे सामने रद्द करावे लागले. 
 
 
पहिल्या दोन सामन्यांपूर्वी भारतीय संघालासुद्धा साऊदम्पटन व लंडन येथे आपले सराव सत्र रद्द करावे लागले. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रतिस्पर्धी संघांना अपेक्षित गुण मिळवता येत नाही आणि क्रिकेटच्या खेळात रममाण होण्यास आलेल्या प्रेक्षकांचाही भ्रमनिरास होतो. प्रेक्षकांना क्रिकेटऐवजी नाईलाजाने इंग्लंडमधील पावसाचा आनंद लुटावा लागतो.
 
या महिन्यात साधारणतः इंग्लंडमधील हवामान उष्ण असते. परंतु या बेमौसमी पावसाने विश्वचषक क्रिकेटचे तीनतेरा वाजविले आहे. स्पर्धेत सहभागी काही प्रतिस्पर्धी संघांनी सामना रद्द करण्याऐवजी इतर दिवशी सामना खेळविण्याची मागणी केली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही विश्वचषकाच्या स्पर्धा कार्यक्रमात विशेषतः गट साखळी सामन्यासाठी पावसाचा व्यत्यय आल्यास त्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. फार तर मर्यादित वेळेपर्यंत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करता येईल आणि त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यांची षटके कमी करून सामना खेळविण्याची तरतूद आहे. पावसाने सामने बाधित होणे हा अत्यंत अयोग्य हवामानाचा दोष आहे, असे आयसीसीने म्हटलेले आहे. निसर्गाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, हे जितके खरे आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या नशिबात जेवढे गुण असेल तेवढेच मिळतील, हेही तितकेच सत्य आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे विश्वचषकाची मजाच निघून जात आहे. इंग्लंडमध्ये लोकांना धावांचा पाऊस बघायचा होता, सामन्याची रोमांचकता अनुभवयाची होती, तिथे त्यांना जलधारा बघाव्या लागत आहे.
 
इंग्लंडच्या हवामान विभागाने पुढील आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाजसुद्धा खरा ठरत आहे. गुरुवारी भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सामना आहे खरा, परंतु आतापासून नॉिंटगममध्ये ढगाळ वातावरण पसरले आहे. अंधुक प्रकाश आहे. त्यामुळे विश्वचषकात धडाकेबाज विजयी सुरुवात करणार्‍या भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून पावसाच्या अवकृपेमुळे एका गुणावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. काल भारतीय संघाला सरावसुद्धा करता आलेला नाही. तसेही सलामी फलंदाज शिखर धवनच्या दुखापतीमुळे भारतीय संघात अस्वस्थता आहे. संघव्यवस्थापन पर्यायी व्यवस्था आणि नवीन व्यूहरचना आखण्यात मग्न आहे. संघातील महत्त्वाचा खेळाडू शिखर धवन नसला तरी पर्यायी खेळाडू म्हणून अनेक दमदार खेळाडू संघात आहे. त्यामुळे गुरुवारी ढग निवळले आणि सामना झाला तरीही बाजी भारतीय संघच मारेल, यात दुमत नाही. कारण कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याचे सामर्थ्य मजबूत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.