ऋतुचक्र

    दिनांक :13-Jun-2019
नीता राऊत 
ऋतू बदलणे हा निसर्गनियम आहे. प्रत्येक ऋतूसोबत माणसाची जीवनशैली, त्याचे खानपान आणि राहणीमान सगळेच बदलते. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता जूनच्या मध्यापासून पावसाचा ऋतू चालू होतो. पावसाळा हा अधिक लोकांचा आवडता ऋतू आहे आणि तो तसा असतोही. त्यामुळे तो आवडणं साहजिकच आहे. रणरणत्या उन्हात घालवलेल्या दिवसानंतर पावसाच्या सरी माणसाच्या शरीराला सुखवणार्‍या असतात. पावसावर सोशल मीडियामध्ये अनेक पोस्ट येतात. विशेषतः अनेक कविता रंगवल्या जातात या पावसावर. गंमतीने असेही म्हटल्या जाते की-‘आला पावसाळा, कवींना संभाळा!’ 
 
 
पण हा पावसाळा प्रत्येकासाठी सुखद आनंद घेऊन येतो, असं नाही. बंगला असो फ्लॅट, वा पक्की घरे, त्यात राहणार्‍यांचा पहिला पाऊस म्हणजे चमचमीत खाद्यपदार्थ, गरमागरम चहा इत्यादींचा आस्वाद घेण्यासाठी असतो तर गरीब झोपडपट्टीमधे राहणार्‍या लोकांसाठी पहिला पाऊस म्हणजे त्यांच्या तडजोडीची सुरुवात असते. मनावर दडपण असते. घरातून निघायच्या आधी जिथे कुठे पाणी गळती होते, तिथे बादल्या ठेऊन निघायचे असते.
 
समजा आपण घराच्या बाहेर आहोत आणि इकडे पाऊस लागला की मन फक्त घरात गुंतले असते, घरातलं साहित्य आणि जिन्नसाचं काय झालं असेल, याची काळजी वाटते. अतिवृष्टी झाली आणि घरात पाणी शिरले तर मग काही बोलायलाच नको. तेव्हा मनात एकच विचार येतो, पावसाळा हा फक्त पैसेवाल्यांचाच! गरिबंसाठी पावसाळा म्हणजे एक धावपळ, तडजोड आणि टेन्शन! कुठे कुठे तर घरात पाणी शिरले की तेथील रहिवाशांना सर्व सामान वगैरे बांधून घर रिकामे करून दुसर्‍या वस्तीत कुठे खोली मिळते काय, याकरिता धावाधाव करावी लागते.
 
मानवी आयुष्यासाठी आणि निसर्ग कायमस्वरूपी सुंदर राहण्यासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांचे आगमन आणि अस्तित्व अगदी समतोलरीत्या असायलाच पाहिजे. बस काहींची सोय आणि काहींची गैरसोय होणं, हा कदाचित नियतीचाच भाग असतो. ज्याला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.