अपेक्षांचं ओझं!

    दिनांक :13-Jun-2019
 सर्वेश फडणवीस 
 
अपेक्षा आणि ओझं दोन्ही शब्दांत कुठलीही साम्यता नाही. पण अपेक्षा आली की मानवी मन त्या अपेक्षांचं ओझं घेऊन दैनंदिन जीवनात वावरत असतं. असंख्य ओझ्याखाली ते असतंच पण प्रत्येकाच्या अपेक्षानं ते ओझं आणखी वाढतच जातं. त्यातून निर्माण होतो, फक्त न फक्त ‘दुरावा!’ या अपेक्षा कमी अधिक असतात पण त्याचं ओझं झालं, की मन दुर्लक्षित झाले म्हणूनच समजावे लागेल. आज जागतिकीकरणाचा प्रभाव यामुळे अपेक्षांचं ओझं सांभाळणे तसे कठीणच झाले आहे.
 
आज 21 वे शतक हे तसे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात अनेकांच्या प्रति अपेक्षांचं ओझे वाढले आहे. अनेक खुणावत असलेल्या भौतिक विकासाच्या संधी यानेही तरुणांच्या अपेक्षांचं ओझं वाढलं आहे हे आपण बघत असतोच. आज अपेक्षेच्या ओझ्याखाली मारली जाणारी मूळची प्रतिभा कुठेतरी हरवली की काय, असे वाटते.
 

 
 
प्रत्त्येक माणूस प्रत्येकाकडून कसली ना कसली अपेक्षा ठेवत असतो आणि त्याच अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर अपेक्षाभंग होऊन टोकाचे पाऊल उचलत असतो. माणसाला याच अपेक्षा माणसापासून आज दूर करत आहेत. पती-पत्नीमध्ये, भावा-भावामध्ये, भाऊ-बहिणीमध्ये, आई-वडील आणि मुलांमध्ये या वाढीव अपेक्षा असल्यामुळे दुरावा निर्माण होत चालला आहे. मित्रा-मित्रांमध्ये,मैत्रिणी-मैत्रिणींमध्ये सध्या ही परिस्थिती बघायला मिळते आहे. वडिलांना आपल्या मुलांने आपल्या मनाप्रमाणे करियर निवडावे ही अपेक्षा असते तर मुलाला आपल्याला कोणते करियर आवडते, त्यात वडिलांनी मदत करावी हीच अपेक्षा असते. पत्नीने मी म्हणेन तेच ऐकलं पाहिजे, ही नवर्‍याची अपेक्षा तर पतीने आपल्याला समजून घ्यावे, ही पत्नीची अपेक्षा असते.
 
मित्राला किंवा मैत्रिणीला वाटते- त्याने किंवा तिने माझे ऐकावे इतरांचे ऐकू नये. यासारख्या असंख्य अपेक्षांचं ओझं माणूस आपल्या पाठीवर घेऊन उगाच वाहत आहे. एखाद्याला पैशांची मदत करताना, आपल्या मनात जी चांगुलपणाची भावना निर्माण होते, तो आपला बर्‍याच अंशी स्वार्थ असतो. आपल्या मुलांवर प्रेम करणं नैसर्गिक भावना असली, तरी असंच प्रेम त्यांनी आपल्यावर करावं, ही अपेक्षा असते. परंतु, हे न ओळखता आपण अनेकदा आपल्या कृतीला नि:स्वार्थीपणा असे संबोधून तो असा कसे वागू शकतो, असे बोलून विनाकारण अपेक्षा मनात बाळगत असतो.
 
प्रत्येकाने स्वार्थी असावे. स्वार्थ म्हणजे स्वचा अर्थ- स्वत:च्या जगण्याचा अर्थ! एवढा भाव समजून घेतला की नि:स्वार्थीपणाचं उदात्तीकरण आणि स्वार्थी शब्दांत दडलेला नकारात्मक भाव आपोआप गळून पडेल. अर्थात स्वत:च्या जगण्याचा अर्थ समजून घेणं सोपं नसतं. तो न समजल्यामुळे अनेक गोष्टींना आपण हेतू जोडत असतो. मी तिच्यासाठी इतकं केलं, पण तिला किंमत नाही.
 
त्याच्यासाठी एवढं केलं, पण त्याला जाणीव नाही. यातील ती, तो, ते, म्हणजे कधी आपली मुलंबाळं असतात, कधी मित्रमंडळी, कधी संस्था! त्या वेळी मी केलं, ते मला वेळ होता म्हणून केलं. मला हौस होती म्हणून केलं. त्यातून मला आनंद मिळत होता म्हणून केलं हे कळायला लागतं, तेव्हा करण्यातील आनंद उमगायला लागतो, आणि अपेक्षांचं ओझं हलकं होऊन जातं. कधी कुणाकडून अपेक्षाच ठेवू नयेत, म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख भोगावे लागणार नाही, हे वाक्य ऐकायला खूप छान वाटतं. परंतु आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं अपेक्षा ठेवणार, फक्त अपेक्षा या आपण आपल्यापुरता ठेवणं महत्त्वाचं. आपण करतो ती कोणतीही गोष्ट, मग भले ती समाजसेवा असली, तरी ती आपल्या अंतर्मनाला सुखावत असते, आपला स्व फुलवत असते हे समजून घेता आलं, तर अपेक्षांचं ओझं हलकं करायला आणि स्वचा अर्थ ओळखायला नक्कीच मदत होऊ शकते.
 
तुम्ही कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता जीवन जगण्याचा प्रयत्न करून बघा जीवन जगणे किती सोपं आहे, हे लक्षात येईल. विनाकारण आपण या अपेक्षा बाळगत असतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की मग माणसाची चिडचिड होते भांडण होतात आणि शेवटी आत्महत्यासारखी टोकाची पावले उचली जातात. प्रत्येकाला आज स्वातंत्र्य आहे. जीवनात प्रत्येक व्यक्तीला, वेळेला महत्त्व द्या. काही गोष्टी सोडून दिल्यानं सुटतात त्यांना उगाच ताणत बसू नये आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक सोडून देणे उत्तम. प्रत्येक गोष्टीवर काळ हा सर्वात चांगला उपाय आहे.
 
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपले अमूल्य जीवन वाया घालवू नका. आपल्या जाण्याने खरंच प्रश्न सुटणार आहेत का, याचा ही विचार करायला हवा. आपल्या जाण्याने पाठीमागच्या लोकांचे काय होत असेल, याचे भान ठेवल्यास असा विचार मनात येणार नाही. आणि या अपेक्षांचं ओझं घेऊन आपण वावरणार नाही. आज आयुष्यातील निखळ आनंद संपविण्याचा खेळ म्हणजे अपेक्षाभंग आहे. यातून राग, द्वेष, निराशा, सूड ही सर्व नकारात्मकता येत असते. आज हीच नकारात्मकता आपले इच्छित हेतू साध्य करण्यासाठी बाधक आहे. ही नकारात्मकता बदलण्याची सवय आपण स्वतः ठेवली पाहिजे आणि एक अपेक्षा आपण आणि एक अपेक्षा समोरच्याने कमी केली तर जो आनंद होईल त्याने सकारात्मक वातावरण तयार होईल आणि नात्यात हेच आज आवश्यक आहे. चला हळूहळू अपेक्षांचं ओझं कमी करत सकारात्मक परिवर्तन घडवून नातं अधिक घट्ट करूया...