कार्यकर्ते दुखावल्याने काँग्रेससाठी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक

    दिनांक :13-Jun-2019
यवतमाळ: कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला पराभवाचे धक्यामागून धक्के भेटत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांच्याकडेही मतदारांनी पाठ फिरवली.  असे असले तरी विधानसभेबाबत नेते कमालीचे आशावादी आहेत. नेते उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीतील नेत्यांची मर्जी सांभाळण्यात व्यस्त आहेत. या साऱ्यात कार्यकर्ते दुरावल्याने कुणाच्या बळावर विधानसभेत ताकद दाखविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. याऊलट भाजप-सेनेने कार्यकर्त्यांची फळी उभारत विधानसभेची तयारी केल्याचे चित्र आहे.

 
 
सतत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलेले माणिकराव ठाकरे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष झाले. विधानपरिषदेत आमदार झाले. पुढे उपसभापतीही झाले. या लोकसभा निवडणुकीत अनेकांचा विरोध असताना उमेदवारी मिळविली. मागील १५ वर्षांत त्यांच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क नव्हता. त्यांचे मुख्यालय मुंबई किंवा दिल्ली होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे हंसराज अहिर यांनी मतदारसंघात दौरा करून कार्यकर्त्यांचे आभार मानले. पण, माणिकराव यांना वेळ मिळाला नाही. अजूनही ते मुंबईत व्यस्त आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील नाराजी वाढू लागली आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजीमुळे नेत्यांच्या आव्हानात वाढ झाली आहे.