धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

    दिनांक :13-Jun-2019
मुंबई: सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असल्याने धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्याकडून औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
 
 
 
अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी दिले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंडे यांची बाजू ऐकून घेण्यास होकार दिला असल्याने तूर्तास त्यांना दिलासा मिळाला असून, यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.