शिवनीने घेतला बिग बॉसशी पंगा

    दिनांक :13-Jun-2019
मुंबई,
बिग बॉसच्या घरात एरव्ही इतर सदस्यांशी तावातावाने भांडणाऱ्या शिवानी सुर्वेने आता थेट बिग बॉसशीच पंगा घेतलाय. 'मला या घरातून बाहेर काढा नाहीतर मी बिग बॉसवर कायदेशीर कारवाई करेन' अशी धमकीही तिनं जाहीरपणे दिलीय. शिवानीला बिग बॉसच्या घरात राहणं आता सहन होत नाहीए. त्या घरात सतत होणारी भांडणं, त्यामुळे अनावर होणारा राग या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतोय असं तिचं म्हणणं आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिच्या माणसांची गरज आहे, तिला त्यांच्यासोबत राहायचंय. त्यामुळे, मला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा अशी विनंती ती वारंवार करत आहे. परंतु, अनेकदा सांगूनही बिग बॉस ऐकत नसल्याने तिनं घरातच बंड पुकारायला सुरुवात केलीय. ' बिग बॉस मला जोपर्यंत कनफेशन रूममध्ये बोलावणार नाहीत, तोपर्यंत मी माईक घालणार नाही, मी टास्क खेळणार नाही' असं तिनं जाहीर केलं.
 

 
 
बिग बॉस कोणत्याच स्पर्धकाला त्याच्या इच्छेविरोधात इथं राहण्यास भाग पाडू शकत नाहीत, त्यांनी असं केलं तर मी कोर्टात जाईन. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन' अशी धमकीही तिनं दिलीय. घरातील सगळ्याच स्पर्धकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती कोणाचेही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी, मध्यरात्री २ वाजता बिग बॉसनं तिला आणि नेहाला कनफेशन रूममध्ये बोलावले. शिवानीला काही सांगायचे असल्यास आत्ताच सांगावे असा आदेशही दिला. तेव्हा शिवानीनं पुन्हा एकदा घरातून तिला बाहेर काढण्याची विनंती बिग बॉसला केली.
 
बिग बॉस तिच्या म्हणण्याचा विचार करतील असं म्हणाले. परंतु, तिनं कायद्याची भाषा केल्याने आता कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय होईल असंही सांगितलं. त्यावर मात्र शिवानी घाबरली, 'राग अनावर झाल्याने माझ्या तोंडून चुकून कायद्याची भाषा निघाली. माझ्या घरी प्रचंड आर्थिक अडचणी आहेत. मी या शोमध्ये माझ्या-मैत्रिणींचे पैसे उधार घेऊन आलेय. त्यामुळे कायदेशीर लढाई मला परवडणार नाही. म्हणून, कायद्याच्या मार्गानं न जाता सामोपचारानं यावर उपाय शोधू', अशी विनंती तिनं बिग बॉसला केलीय. त्यामुळे, शिवानी आता खरंच गेम सोडून घरातून बाहेर जाणार की हे सगळं अजून एक नाटक होतं हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.