आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत

    दिनांक :13-Jun-2019
मुंबई: शिवसेना नेते आदित्य ठाकरे येत्या विधानसभा निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. अश्यातच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चेत आणखीनच रंग भरले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे राज्यातील जनतेला वाटत आहे. एका युवा नेतृत्वाच्या हातात राज्य द्यावे अशी जनतेची इच्छा असल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आहे.
 

 
 
 
 
काही दिवसांपूर्वीच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत शिवसेना-भाजपाच्या युतीवर भाष्य केले होते. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेत सत्तेचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे असे सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तसे ठरले आहे त्यामुळे जे या बैठकीत उपस्थित नव्हते त्यांनी वेगवेगळी विधान करुन युतीत बिघाड करु नये असा टोला हाणला होता.
संजय राऊत आणि अन्य शिवसेना नेतेही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. पक्षांतर्गत आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणं सुरक्षित राहणार आहे याचा आढावा घेण्याचं कामही सुरु आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, निवेदन देत अनेक महाविद्यालय निवडणुकींमध्ये स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळे आदित्य ठाकरेंना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली.
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. अद्याप अधिकृतरित्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्यावर कोणतंही भाष्य केलेले नाही.