शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वाधिक पगार, भूतान सरकारचा निर्णय

    दिनांक :13-Jun-2019
थिंफू,
भूतानमध्ये शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिक्षक, डॉक्टर, नर्स, मेडिकल कर्मचाऱ्यांचा पगार आता भूतान सरकारमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असणार आहे.

 
प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, ट्रिप आणि इतर भत्ते दिले जातात. सहाजिकच तुलनेने त्याचे पगार इतर कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक असतात. मात्र पुढची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना योग्य सुविधा मिळत नाहीत, तसेच डॉक्टर आणि मेडिकल कर्मचारी देखील रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतात, त्यांचा जीव वाचवतात. मात्र त्यांना योग्य पगार मिळत नाही.
भूतान सरकारने हीच बाब गांभीर्याने घेत, नव्या वेतन श्रेणीनुसार शिक्षक, डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेतनवाढीचा भूतान सरकारवर मोठा बोजा पडणार आहे, मात्र त्याची चिंता बाजूला सारुन भूतान सरकारने हा निर्णय घेतला आहे.
भूतानमधील ज्येष्ठ डॉक्टरांना कॅबिनेट सचिवापेक्षा जास्त पगार दिला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ डॉक्टर सर्वात जास्त पगार घेणारं आणि सर्वात मोठं सरकारी पद मानलं जाणार आहे. भूतानमधील क्लास-2 दर्जाच्या डॉक्टरांना तेथीन चलनानुसार 75,682 Nu एवढा पगार मिळणार आहे, तर सचिव पदाच्या अधिकाऱ्यांना 73,845 Nu पगार मिळणार आहे. तसेच क्लास- 1 दर्जाच्या डॉक्टरांना 90,219 Nu एवढा पगार मिळणार आहे, तर कॅबिनेट सेक्रेटरी पदाच्या अधिकाऱ्यांना 82,685 Nu पगार मिळणार आहे.
शिक्षक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सर्वात जास्त कष्ट करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. भूतानमधील शिक्षण क्षेत्रातील 8 हजार 679 शिक्षकांना आणि 4000 मेडिकल स्टाफला सरकारच्या या निर्णयाच फायदा होणार आहे. सरकारच्या निर्णयानंतर अनेक शिक्षक, डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफने भूतान सरकारचे आभार मानले आहे. भूतानमध्ये इतर देशांप्रमाणे जीडीपी मोजला जात नाही, तर फक्त जीएनपी म्हणजेच ग्रॉस नॅशनल हॅपिनेस मोजला जातो.