पाचही मुलांची हत्या करणाऱ्या पतीवर दया दाखवण्याची पत्नीची न्यायालाकडे मागणी

    दिनांक :13-Jun-2019
पाचही मुलांची हत्या करणाऱ्या आपल्या पतीवर न्यायालयाने दया दाखवावी अशी विनंती महिलेने करताच दक्षिण कॅरोलिना येथील न्यायालयात उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अॅम्बर कझेर यांनी ज्युरीकडे आपल्या पतीला सोडून द्यावं अशी मागणी केली आहे. ‘त्याने माझ्या मुलांवर कोणतीच दया दाखवली नाही. पण माझ्या मुलांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं. जर मी माझ्या नाही पण मुलांच्या बाजूने बोलत असेन तर मला हेच सांगायचं आहे’, असं अॅम्बर कझेर यांनी न्यायालयात सांगितलं आहे.

 
 
न्यायालायने अॅम्बर कझेर यांचा पहिला पती टिमोथी जोन्स याला पाच मुलांची हत्या केल्याप्रकऱणी गेल्याच आठवड्यात दोषी ठरवलं आहे. जोन्स याने ऑगस्ट २०१४ मध्ये घरातच आपल्या पाचही मुलांची हत्या केली होती. आरोपी जोन्सला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची जन्मठेपेची याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.
आपण जोन्ससाठी प्रार्थना करत असून, मृत्यूदंडाला विरोध असल्याचं अॅम्बर कझेर सांगत आहेत. मात्र न्यायालयात सुनावणीदरम्यान अनेकदा अशी वेळ आली जेव्हा अॅम्बर कझेर यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘माझ्या मुलांना काय सहन करावं लागलं हे मी ऐकलं आहे. एक आई म्हणून मला संधी मिळाली तर मी त्याचा चेहरा ओरबाडून टाकीन. या माझ्यामधील आईच्या भावना आहेत’, असा संताप अॅम्बर कझेर यांनी व्यक्त केला होता.
आरोपी जोन्स याने पोलिसांकडे कबुली देताना आपला सहा वर्षांचा मुलगा पहिल्या पत्नीसोबत मिळून आपल्यावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याने हत्या केल्याचं सांगितलं होतं. यानंतर काही तासांनी जोन्स याने इतर मुलांचीही गळा दाबून हत्या केली होती.