आकर्षक वाहन योजनेच्या नावाखाली २१ लाखांनी फसवणूक

    दिनांक :14-Jun-2019
पाच जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा
अकोट,
कार घेणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न असते. आयुष्यात एकदा तरी चारचाकी घ्यावी, यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो. चारचाकीच्या एका आकर्षक योजनेच्या आमिषाला बळी पडून अकोला जिल्ह्यातील १७ इच्छूकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या १७ ग्राहकांची तब्बल २१ लाख ५५ हजार ६६० रुपयांनी फसवणूक झाल्याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात पाच भामट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. मागीतले काय अन् मिळाले काय, या उक्तीनुसार या ग्राहकांनी प्रति वाहन चार लाख २० हजार रुपये देऊन त्यांना चारचाकीचे केवळ दोन लाख ७० हजार रुपये किंमतीचे नोंदणी नसलेले बेसीक मॉडेल देऊन भामट्यांकडून त्यांची बोळवण करण्यात आली. 
 
या संदर्भात पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारकर्ता व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास साबळे यांचे दिवंगत नातेवाईक डिगांबर अवारे रा.अकोट यांना ओरीस इंटरनॅशनल,मुंबईच्या आकर्षक चार चाकी योजनेची माहिती मिळाली.त्या योजनेप्रमाणे डटसन रेडीगो ह्या कंपनीचे टी मॉडेल चारचाकी मिळण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये रोख व तीन लाख १५ हजार रुपयांचे कर्ज असे एकूण चार लाख वीस हजार रुपये द्यावयाचे होते.त्या व्यतिरिक्त पाच हजाराचा विमा काढायचा होता. त्यासाठी अवारे यांनी रोख रकमेचा ड्राफ्ट मुंबई येथील ओरीस कंपनी व कर्जाची रक्कम ठाणे येथील रितू निसान सेल्सला पाठविली.प्रत्यक्षात अवारे यांना चारचाकीचे नोंदणी नसलेले सुमारे दोन लाख ७० हजार रुपये किंमत असलेले बेसीक मॉडेल पाठविण्यात आले.
 
एकूण चार लाख २० हजार रुपये मोजूनही हाती आलेले वाहन कमी किंमतीचे असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचा धक्का बसून डिगांबर अवारे यांचा हृदयआघाताने मृत्यू झाल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.या योजनेअंतर्गत ओरीस कंपनी त्यांच्या प्रत्येक चारचाकी धारकाला दर महिन्याला पाच हजार रुपयांचे पेट्रोल व नऊ हजार रुपये वाहनाचा कर्ज हप्ता देणार होती. प्रत्यक्षात हा लाभ सुध्दा मिळाला नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.अश्याच स्वरुपाची जिल्ह्यातील इतर १६ नागरिकांचीही फसवणूक झाल्याचे त्यांच्या तक्रारींसह या तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारींवरुन ठाणेदार संतोष महल्ले यांनी सखोल तपास करुन आरोपी सुरेंद्र साहू व शर्मिष्ठा साहू (ओरीस कंपनी)रा.मुंबई,मालक-रितू निसान ठाणे,रत्नदिप बोंद्रे,संजय तराळे,रा.अकोट या पाच जणांविरुध्द फसवणूकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला.