कटेझरी येथील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबली.

    दिनांक :14-Jun-2019
 पोलीस अधिक्षकांकडुन अवघ्या १५ दिवसांत वचनपूर्ती दारांत आलेले पाणी पाहून महिलांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
 
गडचिरोली: अतिदुर्गम, अतिसंवेदनशील अशा पोलीस मदत केंद्र, कटेझरी अंतर्गत मौजा कटेझरी गावाला मा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सो यांनी दिनांक २९ मे  रोजी भेट दिली होती. यावेळी त्यांनी कटेझरी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या. गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व लहान मुला-मुलींना करावी लागणारी वणवण व पायपीट पोलीस अधीक्षकांसमोर समोर मांडली होती. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी नागरीकांची व्यथा समजून घेत शक्य तितक्या लवकर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन कटेझरी गावातील नागरिकांना दिले होते.

 
 
दरम्यान आज त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अवघ्या १५ दिवसांत करण्यात केली. मौजा कटेझरी गावात गडचिरोली पोलीस दलातर्फे बोअरवेल खोदून देण्यात आला. गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी बोअरवेलचे बाजुस पाण्याची टाकी बसविण्यात आली.त्याचबरोबर नळजोडणी करून टाकीतून नळाद्वारे पाणी ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहचिविण्यात आले.
आज सदर योजनेचा शुभारंभ कटेझरी गावातील प्रतिष्ठित नागरिक भिमाजी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस मदत केंद्र कटेझरी चे प्रभारी अधिकारी अक्षयकुमार गोरड, पोलीस उप निरीक्षक सागर वरुटे, जगन्नाथ मेनकुदळे, पोमके कटेझरी येथील कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते. यावेळी नागरिकांनी पोलीस अधीक्षक बलकवडे यांचे आभार मानले. विशेषतः स्रियांची व लहान मुलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.