दहशतवाद पोसणाऱ्या देशाची आर्थिक नाकेबंदी करा; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोला

    दिनांक :14-Jun-2019
 
 
बिश्केक,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिषदेला संबोधित केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आले पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशाची आर्थिक कोंडी केली पाहिजे, असा टोला त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता लगावला.
 
SCO मध्ये अफगाणिस्तानच्या विकासाचा रोड मॅप तयार झालेला आहे. मोदींनी जेव्हा दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले, त्यावेळी तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते.
 
दहशतवाद पसरवण्यासाठी त्यांना समर्थन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत करणारे देश जबाबदार आहेत. 'टेररिज्म फ्री सोसायटी' झालीच पाहिजे. श्रीलंकेत गेलो होतो, तेव्हा दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. दहशतवादाविरोधात एससीओच्या सर्वच देशांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक देशाने आपल्या भूभागाला सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मजबूत करणं आवश्यक आहे. हेल्थ केअर, इकॉनॉमिक, पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात काम करावे लागणार आहे. भारत मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी बहुपक्षीय व्यापार प्रणाली गरजेची आहे. अक्षय ऊर्जेचा भारत सहावा आणि सौर ऊर्जेचा भारत पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
 
 
सध्याच्या युगात चांगल्या कनेक्टिव्हिटी(संपर्काची)ची आवश्यकता आहे. SCO देशांच्या पर्यटकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी केली जाणार आहे. आमच्यासाठी शांतीपूर्ण आणि समृद्ध अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे.