एका 'सोनेरी परी'ची अर्धशतकी खेळी...

    दिनांक :14-Jun-2019
र्मनी’ हा शब्द उच्चारला की, अनेक गोष्टी आठवतात. त्या म्हणजे हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर, ‘हेल हिटलर’ म्हणणारे नाझी सैनिक, जर्मन तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स, जर्मन शेफर्ड कुत्रा, जर्मनीत तयार होणार्‍या वोक्सवॅगन, बीएमडब्ल्यू तसेच मर्सडिज-बेंझ या चारचाकी गाड्या, सणकन कानशिलात मारल्यागत 186 किमी/तास वेगाने सर्व्हिस करणारा टेनिसपटू बोरीस बेकर... इत्यादी इत्यादी. यात भर टाकून मी अजून एक समावेश करेन तो म्हणजे नयनरम्य व्यक्तिमत्त्व- महिला टेनिसपटू- जर्मनीची स्टेफी ग्राफ!
 
 
 
‘खुदा देता हैं तो छप्पर फाड के देता हैं!’ अशी एक म्हण आहे. देशाने तिला पृथ्वीवर ज्यासाठी पाठवलं त्या टेनिसच्या खेळाने तर तिला शिखरावर नेलंच, पण त्याबरोबर एका परीचं सौंदर्यही दिलं. उंची 5’9’’, शिडशिडीत बांधा, सरळ नाक, सोनेरी केस व हसर्‍या चेहर्‍याचा तिचा फोटो पाहिला की पटकन, ‘गोरी गोरी पान, स्टेफी आमची छान’ या ओळी आठवतात.
क्रिकेटमध्ये जसे घणाघाती आणि नजाकतदार असे दोन प्रकारचे फलंदाज असतात तसेच टेनिसमध्येही असतात, असं मी म्हणेन. विली जिन िंकग, मार्टिना नवरातिलोव्हा, व्हिनस व सेरेना विल्यम्स भगिनी ही नावे घणाघाती पद्धतीत मोडतात, तर अरांक्सा सांचेज-विकारीओ, ट्रेसी ऑस्टिन, गॅब्रिएला सॅबातिनी इत्यादी नजाकतदार प्रकारात येतात. स्टेफीही त्यातलीच.
दि. 14 जून 1969 रोजी स्टेफी ग्राफने या भूतलावर येऊन पहिले ‘टॅ हँ’ म्हटले. वडील पीटर ग्राफ व आई हिडी ग्राफ या दाम्पत्याचे हे अपत्य. ‘फ्राऊलिन फोरहँड व डाय ग्राफिन’ ही टोपणनावे असलेल्या स्टेफीचे पूर्ण नाव ‘स्टिफनी मारिया ग्राफ.’ मँहेम, पश्चिम जर्मनीचा तिचा जन्म.
स्टेफीचे प्रथम प्रशिक्षक हे तिचे वडील पीटर ग्राफच होते. त्यांनी, स्टेफी चार वर्षांची असताना टेनिसची रॅकेट तिच्या हातात दिली आणि ती तिने तेव्हा व्यवस्थित सांभाळली, हे विशेष! ‘वाढता वाढता वाढे’ स्टेफीने वयाच्या 13 व्या वर्षी संपूर्ण व्यावसायिक खेळाडू म्हणून 1983 मध्ये टेनिसक्षेत्रात प्रवेश केला. त्या वेळी तिचे मानांकन 124 होते. घरीच असलेल्या टेनिस कोर्टवर, वडील पीटर ग्राफ दररोज चार तास सराव तिच्याकडून करवीत. त्यातून तिचा खेळाचा पाया पक्का झाला. पुढील 4-5 वर्षांत स्फेटीने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला खेळ सुधारला, खेळातील अनुभवही प्राप्त केला आणि आता तो क्षण आला.
साल होते 1988. क्रिकेटमध्ये सन 1978 मध्ये पाकिस्तानच्या झहिर अब्बासने ‘चंद्रा, बेदी, वेंकट, प्रसन्ना’ या फिरकी चौकडीला संपवले आणि त्याच दौर्‍यात ‘हरयाणा हरिकेन’ कपिलदेव निखंजचा उदय झाला. तसेच इथेही आले. टेनिसमध्ये जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन, मेमध्ये फ्रेंच ओपन, जून-जुलैमध्ये विम्बल्डन स्पर्धा (इंग्लंडमध्ये) आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकन िंकवा यु. एस. ओपन स्पर्धा होतात. या चारही स्पर्धा एकाच वर्षात िंजकणार्‍याला ‘ग्रॅण्ड स्लॅम’ किताब मिळतो. 1988 पर्यंत अमेरिकेच्या मार्टिना नवरातिलोव्हाची मक्तेदारी होती. परंतु, 1988 च्या विम्बल्डन स्पर्धेत स्टेफीने तिला दोन सेटमध्ये हरवत तिची मक्तेदारी मोडून काढत स्वत:कडे विजेतेपद हिसकावून घेतले. तिने मार्टिनावर 5-7, 6-2, 6-1 असा विजय मिळवला. 1988 साल हे स्टेफीसाठी अत्यंत भाग्यवान ठरले. तिने ऑस्ट्रेलियन ओपन ख्रिस एव्हर्टविरुद्ध 6-1, 7-6, फ्रेंच ओपन नताशा झ्वेरेवाविरुद्ध 6-0, 6-0 (फक्त 34 मिनिटे सामना चालला), विम्बल्डन मार्टिना नवरातिलोवाविरुद्ध 5-7, 6-2, 6-1, तर यु. एस. ओपन गॅब्रिएला सॅबातिनीविरुद्ध 6-3, 3-6, 6-1 असे िंजकून पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद प्राप्त केले.
इथून स्टेफी ग्राफचा ‘ग्राफ’ दिवसेंदिवस चढताच राहिला. तिचे त्यावेळचे प्रतिस्पर्धी म्हणजे स्पेनची अरांक्सा सांचेज, ऑस्टियाची ट्रेसी ऑस्टिन, अमेरिकेची िंलडसे डेवनपोर्ट, अर्जेंटिनाची गॅब्रिएला सॅबातिनी, युगास्लावियाची मोनिका सेलेस इत्यादी. तिची ही घोडदौड साधारण 1993 पर्यंत व्यवस्थित सुरू होती. तिच्या या अश्वमेध यज्ञाच्या घोड्याला रोखणे मुश्कील झाले होते. फक्त एक मोनिका सेलेसच स्टेफीला मधूनमधून डोकेदुखी ठरत होती आणि मग ती घटना घडली. स्टेफी त्या वेळी एक नंबर मानांकनावर होती. ते तसेच अबाधित राहावे म्हणून स्टेफीचा एक माथेफिरू चाहता जर्मन नागरिक गुंथेर पार्चे याने मोनिका सेलेसवर चाकूहल्ला केला. यात तिच्या पाठीला जखम होऊन ती जवळजवळ दोन वर्षे टेनिसपासून दूर होती. या अनपेक्षित घटनेमुळे स्टेफी अत्यंत हादरली व मानसिक रीत्या अस्वस्थ होती. नंतर हळूहळू सावरली.
यानंतर 1993 पासून ते स्टेफीच्या टेनिसमधून निवृत्तीपर्यंतचा 1999 पर्यंतचा काळ स्टेफीसाठी संमिश्र यशापयशाचा राहिला. 1995 च्या दरम्यान तिच्या वडिलांवर आयकर चुकविल्याचा आरोप होऊन त्यांना तुरुंगवास झाला. त्यामुळे स्टेफी पुन्हा एकदा मानसिक रीत्या ढळली. वडिलांची 45 महिन्यांची शिक्षा 25 महिन्यांवर आल्यामुळे तिला जरासा दिलासा मिळाला, परंतु तिचा खेळाचा ग्राफ हळूहळू उतरणीला लागायला सुरुवात झाली. शेवटी 13 ऑगस्ट 1999 रोजी सॅन दिएगो येथे अमी फ्रेझिअर हिच्याविरुद्ध खेळताना पोटरीचा स्नायू (हॅमस्ट्रिंग मसल) ताणला गेल्याने खेळण्यास बाधा येऊन स्टेफीने महिला टेनिसमधून वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. परंतु, यानंतरही ती सन 2005 पर्यंत, मधूनमधून होणार्‍या प्रदर्शनी सामन्यात खेळून टेनिसशी नाळ जोडून होती.
स्टेफी ग्राफने आपला संपूर्ण खेळ बेसलाईनवर केंद्रित केला होता. ती जास्तीतजास्त वेळा फोरहँड फटकेच मारत असे. बेसलाईनवर खेळत असल्याने तिला संपूर्ण कोर्टवर वावरण्यास आणि परतून आलेल्या फटक्याला परतवण्यास भरपूर वेळ मिळत असे. तिची सर्व्हिस साधारण 174 कि.मी./तास या वेगाने होत असे व तिचे टायिंमग अचूक असे. तसा तिचा बॅकहँडचा फटकाही जोरकस असायचा, पण स्टेफी तो फार कमी खेळत असे. हार्टकोर्ट, ग्रासकोर्ट, क्लेकोर्ट कोणतेही कोर्ट असो, स्टेफी त्यावर लीलया खेळत असे. तिने आपली शारीरिक तंदुरुस्ती व्यवस्थित सांभाळली होती. बेसलाईनवरून मारलेले जोरकस फोरहँड फटके व प्रतिस्पर्ध्यावर हल्ला चढवणे, ही तिच्या खेळाची वैशिष्ट्ये होती.
आपल्या 11 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत स्टेफी ग्राफने एकेरीत 107 विजेतेपदे मिळविली, ज्यात ऑस्ट्रेलियन ओपन 4 (1988, 89, 90, 94), फ्रेंच ओपन 6 (1987, 88, 93, 95, 96, 99), विम्बल्डन 7 (88, 89, 91, 92, 93, 95, 96) यु. एस. ओपन 5 (1988, 89, 93, 95, 96) तसेच सेऊल ऑिंलपिक 1988 चा समावेश आहे. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदात आजही सेरेना विल्यम्सनंतर (23) स्टेफीच दुसर्‍या क्रमांकावर (22) आहे. एकंदर विजेतेपदांमध्येही मार्टिना नवरातिलोव्हा (167) व ख्रिस एव्हर्ट लॉईड (157) नंतर स्टेफी ग्राफ (107) तिसर्‍या क्रमांकावर आहे. वुमन्स टेनिस असोसिएशन (डब्ल्यू. टी. ए.)च्या अहवालानुसार स्टेफी 17 ऑगस्ट 1987 ते 10 मार्च 1991 या काळात सलग 186 आठवडे तसेच एकंदर कारकीर्दीत 377 आठवडे प्रथम मानांकनावर विराजमान राहिली, हा एक रेकॉर्ड आहे.
स्टेफी ग्राफबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत. मार्टिना नवरातिलोवाने तिच्या मनातील केलेल्या महान खेळाडूंच्या यादीत स्टेफीला स्थान दिले आहे, तर बिली जिन किंगने सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये स्टेफीची गणना केली आहे.
तसेच 2004 च्या ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’ आणि 2008 च्या ‘जर्मन हॉल ऑफ फेम’ या पुरस्कारात स्टेफीचा समावेश करण्यात आला आहे. तिला 8 वेळा ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा किताब मिळाला असून, त्यात 1987 ते 1990 या चार सलग वर्षांचा समावेश आहे. स्टेफीने स्वत:च्या जर्मन देशात टेनिस खेळ लोकप्रिय करण्यासाठी जर्मनीच्याच बोरीस बेकर या खेळाडूसोबत आपले योगदान दिले आहे. ऑक्टोबर 2001 मध्ये स्टेफीने, अमेरिकन टेनिसपटू आंद्रे अगासीसोबत विवाह करून आपला संसार थाटला असून त्यांना जदान गिल अगासी आणि जाझ इली अगासी ही दोन अपत्ये आहेत.
दि. 14 जून 2019 रोजी ही सोनेरी परी आयुष्याची 50 वर्षे (अर्धशतक) पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ती क्रिकेट खेळाडू नसली, तरी एक खेळाडू म्हणून तिने आयुष्याचे शतक पूर्ण करावे व आंद्रे अगासी या तिच्या जोडीदाराने खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकावर असावे, हीच शुभकामना!
 
किशोर उ. इंगळे
8888720868