साद ही घालते लाडकी तुला...

    दिनांक :14-Jun-2019
बाप आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे फार कठीण. चार ओळींमध्ये बंदिस्त करावं असं बापाचं व्यक्तिमत्त्व नाही. मुलगी ही घराचे सौख्य असते, तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा, तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपणारा, बोट धरून तिला चालायला शिकवणारा, तिच्या हट्टासाठी घोडा होणारा, तिला खंबीर बनविणारा, तिनं न सांगताच तिचं मन ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाप! लेकीचे पहिले बोबडे बोल, तिने टाकलेले पहिले पाऊल, तिचे लाडिक वागणे, घरभर घुमणारी तिच्या घुंगरांची छमछम... या सगळ्यांनी सुखावतो तो बाबा!
 
 
 
कुठलीही मुलगी जर डोळे झाकून विश्वास करेल तर तो फक्त तिच्या बाबावर! आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आई ज्योती असते, तर बाबा समई असतो. आणि ज्योतीपेक्षा समई जास्त तापत असते, पण नकळतपणे आपण तेजाचे सारे श्रेय केवळ ज्योतीलाच देतो आणि समईचा त्याग विसरतो. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी,’ म्हणत आपण पाळण्याची उभारणी करणार्‍या बाबाला अलगद विसरतो. जिजाऊंनी शिवबाला घडविले, पण शहाजीराजांचे योगदान आपण कसे विसरतो? कवींनी आईवर अनेक महाकाव्य रचलेत, आईला अनेक उपमा दिल्यात, पण अव्यक्तपणे प्रेम करणार्‍या बाबासाठी काव्य का नाही स्फुरलं? बाबाला कोणती उपमा द्यावी? बाबाचं मन भरल्या अभाळासारखं असतं, जे आपल्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करतं. कुटुंबातल्या छोट्यामोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देतो तो बाबा! आर्थिक स्थिती भक्कम असो िंकवा नसो, मुलांचे लाड पुरविण्यात जो कुठेच कमी पडत नाही तो असतो बाबा! आपले दुःख मनात ठेवून दुसर्‍यांना आनंदी ठेवतो तो बाबा! सार्‍या जगाने जरी पाठ फिरवली तरी बाबाचा भक्कम आधार असला की जग िंजकता येतं.
न दाखवता अपिरिमित काळजी करणारं मन असतं बाबाचं. स्वतःच्या इच्छा, हौशी बाजूला ठेवून सतत मुलांसाठी झटणारं अंतःकरण असतं बाबाचं. काळाच्या ओघात बाबा हा खूप फ्रेंडली झाला आहे. आपल्या आधीच्या पिढीला बाबांची भारी धास्ती वाटायची. अमुक गोष्ट करू नको बाबा रागावतील, त्यांना घरी आल्यावर त्रास देऊ नका, ते चिडतील, त्यांच्या आवडीचा बेत करायला हवा नाहीतर त्यांचा मूड जाईल. अभ्यास केला नाही तर बाबा मरतील आणि अशाप्रकारे मुलं बाबांच्या दहशतीत जगायचेत. बाबांपासून चार हात लांबच राहायचेत. दिवसभर दंगामस्ती करणारे मुलं बाबा घरी येताच चिडिचूप. मग बाबा म्हणजे केवळ घरातील बॉस. त्यांचं अस्तित्व असायचं तर कुठे? मुलांच्या आणि आडनावाच्या मध्ये. म्हणून बाबाचं व्यक्तिमत्त्व कठोर मानलं जायचं. पण, डोळ्यांत प्रेम न दाखवता तोही बाप प्रेम करायचा. पण, आजचा बाबा खूप बदलला आहे. ऑफिसमधून थकून आल्यावरही तो मुलांसाठी हत्ती-घोडा होतो, पत्नीला स्वयंपाकात मदत करतो. रविवारी आराम न करता, मुलांसाठी मस्त बेत करतो. मुलांना अभ्यास नाही करावासा वाटला तर क्रिकेटही खेळतो, प्रोजेक्टस्‌मध्ये मदत करतो आणि मुख्य म्हणजे मित्र बनून आपल्या मुलांना समजून घेतो. आई रागावली तरी ‘‘जाऊ दे गं’’ म्हणत आपली बाजू घेतो, मुलांचा मूड ऑफ असेल तर लॉंग ड्राईव्हला नेतो, कमी मार्क्स मिळाले तर पुढच्या वेळेला स्वतःहून मदत करतो, छोट्या छोट्या गोष्टीचं भारी कौतुक करतो.
खरंच आज बाबा किती मनमिळाऊ झालाय ना? जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी जागतिक पितृदिन साजरा केला जातो. ‘टू ऑनर द फादरहूड’ असं या दिवसाचं उद्दिष्ट आहे. त्याला या दिवशी भेटवस्तूंची अपेक्षा नसते. केवळ बाबा तुझं स्थान माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, हे त्याला ऐकावेसे वाटते. एक दिवस त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्याला आवडणारा पदार्थ स्वतः करून खाऊ घाला, बघा तो किती खुश होईल. मृगजळामधे कितीही धावलो तरी त्याचे पाणी होत नाही, आकाश कितीही झुकले तरी सागराला भेटत नाही, कितीही प्रयत्न केला तरीही बाबाच्या प्रेमाला अंत नाही. तूच मला बोट धरून चालायला शिकवलं, तूच मला पडल्यावर धीर दिला, माझं सर्वस्व तूच आहेस, म्हणूनच प्रथम तुला मी वंदिते!
मनात काळजीचे डोंगर उभे असले, तरी संयमाचे घाट बांधणार्‍या, मुलांसाठी कष्ट करणार्‍या, संसाराचा रहाटगाडा चालवणार्‍या, अपरिमित कष्ट सोसणार्‍या बाबाला सलाम! तसेच बाबांची उणीव मुलांना न जाणवू देणार्‍या स्ट्रॉंग आईलादेखील पितृदिनाचा सलाम!
समिधा पाठक
7276583054