उन्हाळ्यामध्ये डोळे कोरडे पडत असल्यास

    दिनांक :14-Jun-2019
उन्हाळ्याचा तडाखा गेल्या काही दिवसांमध्ये आणखीच वाढल्याने याचा त्रास निरनिराळ्या प्रकारे जाणवू लागला आहे. हीट स्ट्रोक, उन्हामध्ये वावरल्याने पित्त, डोकेदुखी, डीहायड्रेशन, त्वचा कोरडी पडणे अशा तक्रारींच्या सोबत डोळे वारंवार कोरडे पडून डोळ्यांची आग होण्याच्या तक्रारीही उद्भवू लागल्या आहेत. अशा वेळी डोळे कोरडे पडल्याने डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि क्वचित डोळ्यांवर हलकी सूजही दिसून येत असते. डोळ्यांच्या या तक्रारीला वैद्यकीय भाषेमध्ये ड्राय आय म्हटले जाते.
 
 
 
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्याच्या अनुसार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यांतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे डोळे कोरडे पडू लागतात. त्यातून ज्या व्यक्ती सतत वाचनाचे िंकवा संगणकावर काम करीत असतात, अशा व्यक्तींच्या बाबतीत ही समस्या अधिक आढळते. वापरत असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस अस्वच्छ असल्यासही डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते. ड्राय आय टाळण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी होते.
 
डोळ्यांवर बाहेरील उष्ण हवामानाचा थेट परिणाम होत असतो. त्यामुळे उन्हामध्ये अधिक काळ वावरल्यास डोळे कोरडे पडू शकतात. त्यामुळे सातत्याने उन्हामध्ये वावर टाळायला हवा. उन्हामध्ये बाहेर पडताना डोळ्यांवर गडद काचांचा गॉगल चढविण्यास विसरू नये. ज्यांचे डोळे वारंवार कोरडे पडत असतील त्यांनी थोड्या थोड्या वेळाने डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. तसेच सतत संगणकावर काम करायचे असेल तर अधून मधून डोळे काही काळ मिटून घेऊन डोळ्यांना विश्रांती द्यावी. थंड दुधामध्ये िंकवा थंड ताकामध्ये कापसाचे बोळे बुडवून हे डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा लालसरपणा आणि होणारी आग कमी होण्यास मदत होते. तसेच गुलाबजलामध्ये कापसाचे बोळे बुडवून डोळ्यांवर ठेवल्यासही डोळ्यांना थंडावा मिळून डोळ्यांची आर्द्रता पूर्ववत होण्यास मदत होते.
 
काकडीच्या चकत्या कापून त्या काही काळ फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवाव्यात, आणि या थंड चकत्या डोळ्यांवर ठेवाव्यात. त्यामुळेही डोळे थंडावतात. वापरलेल्या टी बॅग्ज फ्रीजमध्ये ठेऊन थंड करून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊन डोळ्यांवर असलेली सूजही कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचा कोरडेपणा दूर होत नसल्यास नेत्ररोगतज्ञांच्या सल्ल्‌याने योग्य औषधोपचार करावेत.