चंद्रपूर जिल्‍हयात आरोग्य केंद्रांमध्‍ये कंत्राटी डॉक्‍टर्स नियुक्‍त करण्याचा मार्ग मोकळा

    दिनांक :14-Jun-2019
जि.प. अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या प्रयत्‍नांना यश
 
चंद्रपूर: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये कंत्राटी पध्‍दतीने डॉक्‍टर्सची नियुक्‍ती करण्‍यात येणार असुन चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी या मागणी संदर्भात केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ जून  रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्‍टर्सच्‍या अभावामुळे रुग्‍णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्‍यामुळे जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्‍हयात कंत्राटी पध्‍दतीने डॉक्‍टर्सच्‍या नेमणुका करण्‍याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे मागणी केली होती. त्‍याअनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने विशेष बाब या सदराखाली जिल्‍हयात ४० हजार रू. प्रतीमाह वेतनावर डॉक्‍टर्सची नियुक्‍ती कंत्राटी पध्‍दतीने करण्‍याबाबत मान्‍यता देण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिका-यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एका समितीने थेट मुलाखती घेवुन डॉक्‍टर्सची नियुक्‍ती करण्‍याचे धोरण ठरविण्‍यात आले आहे. परंतु ४० हजार रू. हे वेतन अत्‍यल्‍प असल्‍यामुळे डॉक्‍टर्सचा प्रतिसाद या नेमणुक प्रक्रियेला लाभला नाही त्‍यामुळे आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने हे वेतन ७० हजार रू. करण्‍यात आले आहे. आता समिती मार्फत थेट मुलाखती घेवुन प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये डॉक्‍टर्सच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍याचा मार्ग मोकळा झाला असुन ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुरळीत होण्‍यास मोलाची मदत होणार आहे.