सोरायसिस आणि आयुर्वेदिक उपचारपद्धती...

    दिनांक :14-Jun-2019
आज सोरायसिसचा त्रास कितीतरी लोकांना झालेला आढळतो. आजच्या परिस्थितीत सरासरी हा आजार 5 ते 7 टक्के लोकांत आढळतो. सोरायसिस हा एक त्वचारोग आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती बिघडल्यामुळे हा रोग होत असतो. हा रोग वयाच्या कुठल्याही वर्षी होऊ शकतो, तसेच घरी आई-वडील, मामा, मावशी, काका, आत्या, आजी-आजोबा यापैकी कुणालाही हा आजार असल्यास हा आजार पुढच्या पिढीलापण होऊ शकतो. म्हणजेच हा आजार आनुवांशिकदेखील आहे. यामध्ये रक्तदुष्टी मोठ्या प्रमाणात होऊन याचे महत्त्वाचे कारण ताणतणाव व जेवणातील अनियमितपणा हे असते.
 
 
 
सोरायसिस या रोगाची सुरुवात डोक्याच्या टाळूवरून, कानांमागून, हाताचे कोपरे आणि माकडहाड, गुडघ्यावरील त्वचा िंकवा जिथे वारंवार घर्षण होते अशा ठिकाणापासून होते तसेच बेंबीपासून होत असते. त्या भागात छोटीशी रुपेरी रंगाची, खपली असलेली लहानशी पुळी तयार होते, ही पुळी हळूहळू कडेने पसरू लागते. कालांतराने त्यावरील पापुद्रा जाड होऊ लागतो. त्या भागात खाज, कंडू हे लक्षण अधिक प्रमाणात दिसून येते. खूप खाजवल्यानंतर त्यातून पाण्यासारखा चिकट स्राव येतो. डोक्यामध्ये कोंडा वाढतो. हा कोंढा हे पहिले लक्षण सोरायसिसमध्ये असते. त्वचेच्या ठिकाणी खपल्या तयार होतात. काही काळानंतर हा आजार सर्व शरीरभर पसरतो. झोपेमध्ये अधिक खाजविल्यामुळे जखमा होतात. त्वचेमधून कोंडा निघायला लागतो. तेथील त्वचा सोललेल्या कोंबडीप्रमाणे दिसू लागते. तेथील त्वचा कोरडी पडते, त्वचेला कपड्याचा स्पर्शदेखील सहन होत नाही. या रोगाची वेळेवर चिकित्सा केली नाही, तर हा रोग उपद्रस्वरूप अनेक रोगांना जन्म देणारा ठरतो. त्यात संधिवात हा एक महत्त्वाचा उपद्रव असतो.
 
कारणे-
रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, आनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, नैराश्य, अतििंचता, भीती, घरगुती वादविवाद, वारंवार होणारा जंतुसंसर्ग, वारंवार एकाच ठिकाणी आघात झाल्याने, धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यपान, असमतोल हार्मोन्स, अपथ्यकर आहारविहार, विरुद्धान्न, वातावरणातील बदल जसे अतिथंड वातावरण किंवा हिवाळा, प्रखर उन्हात हिंडणे. 
 
कधीकधी गरोदर अवस्थापण या रोगास कारणीभूत असते. आयुर्वेदात या रोगाचे वर्णन कुष्ठरोग प्रकरणात आलेले दिसून येते. 
 
आयुर्वेदानुसार या विकारात मुख्यत: कफ आणि वात हे दोष बिघडल्याने हा रोग होतो. आयुर्वेदातील सात त्वचेपैकी चौथ्या किंवा पाचव्या थरात बिघाड आल्याने हा रोग होतो. पेशीविभाजनाने त्वचेमध्ये हे स्तर तयार होतात. पेशी विभाजनाचे कार्य हे वातदोषामुळे घडते. त्वचा हा मांसधातूचा उपधातू आहे. त्वचेला उपयुक्त असेल असा भाग मांसधातूपासून घेतला जातो व साधारणत: 27 दिवसांमध्ये एक एक स्तर निर्माण होऊन बाह्य त्वचा निर्माण होते.
 
पण, जेव्हा वातदोषाची दुष्टी होते त्या वेळी हे पेशीविभाजनाचे कार्य अधिक लवकर व्हायला लागते. परिणामी पेशीची अत्याधिक वाढ होते. तेथे पांढर्‍या रंगाच्या कांद्याच्या सालीप्रमाणे पातळ असा चंदेरी रंगाचा चामडीचा थर तयार होतो. पण, दुष्ट कफामुळे या पेशींचे थर पूर्णपणे सुटत नाही, ते तिथेच चिटकून राहते. त्वचेमधील केशवाहिन्या विसकटून जातात. त्यात अधिक रक्त राहते. त्यामुळे त्वचा लालसर व जाड दिसू लागते. पापुद्रे अर्धवट सुटल्यामुळे माशांचे खवले जसे असतात त्याप्रमाणे त्वचा दिसू लागते. कधीकधी तेथील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे तेथून रक्त वाहू लागते. ज्या सोरीअसिसच्या जखमामधून रक्त येते तेथील चट्टे आरक्तवर्णी म्हणजे लालसर असतात अन्यथा त्यांचा रंग हा काळा किंवा करडा असतो. त्या ठिकाणची त्वचा कडक बनते व फाटते, त्या ठिकाणी घाम येणे पूर्णत: बंद होते.
 
उपचार-
आजाराची तीव्रता पाहून आयुर्वेदात सांगितलेल्या शमन व शोधनपद्धतीचा उपयोग करून चिकित्सा केल्यास रुग्णाला लाभ मिळतो. सर्वप्रथम शरीरातील दूषित झालेले दोष वमन, विरेचन, रक्तमोक्षण यासारख्या पंचकर्माद्वारे काढल्यास रोगाचा पुनरुद्भव टाळता येतो.
 
त्यानंतर निरनिराळी रसप्रसादक, रक्तशुुद्धिकर, त्वचाशुद्धिकर औषधी, रुग्णाचे परीक्षण करून द्याव्यात. यासाठी सारिवा, मंजिष्ठा, निंब, हरिद्रा, खदिर, गुडूची, अतिविशा यासारख्या औषधींनी युक्त कल्पाचे प्रयोजन करावे.
 
मानसिक ताण-तणावामुळे उत्पन्न होणार्‍या सोरायसिसमध्ये मनोबल वाढविणार्‍या औषधी, उदा.- ब्राह्मी, अश्वगंधा, शंखपुष्पी, जटामांसी यासारखे कल्प वापरावे. सोबतच शिरोधारा, शिरोबस्ती, अभ्यंग, पादाभ्यंग, शिरोभ्यांग, तक्रधारा पद्धतीचा वापर करावा.
 
याचबरोबर महातीक्तक घृत, यष्टीमधू सिद्ध, कामदुधा रस, आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन, वसंत कुसुमाकर रस, हरिद्रा खंड, पंचतिक्त घृत, सोमल कल्प, श्वासकुठाररस इ. कल्पाचा वापर आजाराच्या अवस्थेनुसार व रुग्णाच्या प्रकृतीनुसार केल्यास अतिशय चांगले असे परिणाम मिळतात व या आजारापासून संपूर्ण मुक्ती मिळते. तसे पाहता हा आजार कधीही बारा होत नाही, असे दुसरी चिकित्सापद्धती सांगते. परंतु, आयुर्वेदामध्ये काही पथ्य व औषधांची उपाययोजना केल्यास हा आजार संपूर्णपणे सरासरी 2 ते 3 वर्षात संपूर्ण बरा होतो.
• डॉ. नितेश खोंडे
9665052929