बलात्कार एक मानसिकता...

    दिनांक :14-Jun-2019
आज सकाळी नीलिमा लवकर उठली. का कुणास ठाऊक, तिची गावाला जायची इच्छा होत नव्हती. काल मामाचा फोन आला आणि उद्या मामाकडे जायचे आहे, असे आईने सांगितले. रात्रभर झोप येत नव्हती. मामाकडे जायची नीलिमाची अजीबात इच्छा नव्हती. नीलिमाला तिच्या आईशिवाय कोणीच नव्हते. काही वर्षापूर्वी तिचे वडील तिला कायमचे सोडून गेले. तेव्हापासून ती आणि तिची आई एकटेच राहात होते. इच्छा नसताना तिला आईसोबत मामाकडे जावे लागले. तिथे गेल्यावर तिला खरा प्रकार कळला. तिला हे स्थळ चालून आले. तिला जबर धक्का बसला. ती लग्नाला तयार नव्हती. आईने आणि मामाने तिला खूप खोदून विचारले. इतकी वर्षं मनात लपवून ठेवलेली गोष्ट अखेर तिने मामाला व आईला सांगितली. वयाच्या 8 व्या वर्षी, घरात कुणी नसताना शेजार्‍याने, वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे एकदा नव्हे, तर अनेकदा घडले. पण, भीतिपोटी व बदनामी होईल म्हणून तिने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. तेव्हापासून तिने लग्न या शब्दाचा धसका घेतला.
 
 
 
समाजात नीलिमासारख्या अशा कितीतरी मुली असतील, त्या मुक्याचा मार सहन करत असतील. आज सामाजिक अवस्थेत जखडलेला हीन प्रवृतीचा पुरुष किती दिवस स्त्रीवर अत्याचार करत राहील, याला काही अंत आहे का? समाजात घडणार्‍या विविध उपद्रव्य कृतीला आपण गुन्हा म्हणून संबोधतो. दुर्दैवाने लैंगिक वर्तणुकीविषयी असा कोणताही गुन्हा अस्तित्वात नाही.
 
समाजात सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यात अल्पवयीन मुलींची संख्या वाढत आहे. चिमुरड्यांवर झालेल्या बलात्काराच्या घटना समाजाला अतिशय घृणास्पद, प्रक्षोभक आहेत. बलात्कार म्हणजे बलाचा वापर करून केलेली जबरदस्तीने संभोगवृत्ती. ज्याच्यावर ही घटना घडते अर्थात ती मनाविरुद्ध असते. िंहसक वृत्तीचा पुरुष बलात्कार करताना वयाचा विचार करत नाही. मग ती तरुणी असो, वयस्कर बाई असो वा पाच वर्षांची चिमुरडी असो! हा प्रश्न सामाजिक गांभीर्याचा आहे. हा प्रश्न समाजजागृतीचा बनला आहे. साधारणपणे समाजाने याची मानसिकता समजून घ्यायला हवी.
 
सर्वसाधारणपणे बलात्कार आणि अल्पवयीन बलात्कार यामधे अल्पवयीन हा जास्त गंभीर स्वरूपाचा आहे. कारण अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार वारंवार होऊ शकतो, कारण सेक्स अपील तिची वागणूक नसताना कोवळ्या मनावर असे प्रसंग हे अति शारीरिक क्रौर्याचे द्योतक असतात. कारण त्या अल्पवयीन तरुणीमधे तारुण्यसुलभ भावना विकसित न झाल्याने तिला हे काय चालले आहे, हा काय प्रकार आहे, हे कळत नाही. अशा प्रसंगातून बालिकांच्या मनावर शरीरावरील जखमेपेक्षा कधीही भरून न येणार्‍या जखमा होत असतात.
बलात्काराला प्रवृत्त करणार्‍या कारणांमधे प्रबल गुन्हेगारी प्रवृत्ती, हे कारण अतिशय महत्त्वाचे आहे. याला जबाबदार कोण? या कोवळ्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून या पुरुषी हिंसक वृत्तीला काय बरे मिळत असते? या पुरुषी हिंसक प्रवृत्तीत जखडलेल्या पुरुषाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून या समस्या सुटणार नाहीत. देशातील प्रत्येक नागरिकाने शांतपणे आणि सामंजस्यपणाने या हिंसक प्रवृत्तीचा विचार करायला हवा. यावर तोडगा काढायला हवा. हे सगळं बघता एक प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो, स्त्री ही खरोखर सुरक्षित आहे काय? समाजात आज स्त्रीवर वेगवेगळे अत्याचार होताना बघतो. रस्त्याने जाताना सामाजिक अवस्थेत जखडलेल्या जखमी पुरुषाच्या वटारलेल्या डोळ्यांपासून स्त्रीला स्वत:ला वाचवून राहावे लागते. रस्त्याने जाता-येता स्त्रीला छेडलं जातं. खरंच आज स्त्री, पुरुषाप्रमाणे समाजात मोकळी, बिनधास्त राहू शकते का?
रोजच्या वर्तमानपत्रांत बलात्काराच्या बातम्या वाचून अक्षरश: लाज वाटते. निर्घृण कृत्याच्या समाजात, पुरुष हा एकाच वेळी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि त्याच वेळी जिवंत देवीचा अंश असलेल्या बालिकांवर अत्याचार करतो. एकाच वेळी पृथ्वीवर जीवसृष्टी सापडल्याचा आनंद व्यक्त करतो आणि त्याच वेळी स्त्रीच्या गर्भात वाढलेल्या सात महिन्यांचा गर्भ मुळापासून खोडून काढतो, तो स्त्री जातीचा आहे म्हणून. ही केवढी विकृत विसंगती म्हणावी या पुरुषाची! स्त्री जातीचा केवढा अपमान आहे हा! जगण्यातला स्त्रीचा सम्मान दिवसेंदिवस हरवत चालला आहे. मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की, बलात्काराची पे्ररणा लैंगिक नसून, त्यात श्रेष्ठत्वाचा आणि वर्चस्वाचा भाग अधिक प्रमाणात असतो. दुसर्‍याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि त्यावर अधिकार गाजवण्याचा विचार हा पुरुषी हिंसक प्रवृत्तीला बळी ठरतो. आज पाच वर्षांची निरागस बालिका या हिंसक प्रवृत्तीला कसा बरे विरोध करत असेल? तर्काच्या आणि बुद्धीच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं हे कृत्य आहे. कायदा करून स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळू शकेल? आज गुन्हेगाराला जर फासावर लटकवलं तर उद्याचा बळी टळणार आहे का? शिक्षेची अंमलबजावणी करून, गुन्हेगाराला शिक्षा देऊन स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळू शकेल? स्त्रीच्या पोटातला गर्भ ते मृत्यूच्या शय्येपर्यंत स्त्रीत्वाची अखंड चाललेली ही अवहेलना कधी थांबणार? कायदे करून समाजात चाललेल्या हिंसक वृत्तीला समाजातील मूल्ये सुधारतील का?
आज आपण पाहतो, समाजातला पुरुष म्हणतो की, मुलींनी तोकडे कपडे घालायला व रात्री-अपरात्री फिरायला नको. अरे, त्या पाच वर्षांच्या मुलीने कोणते कपडे घातले होते? ती कुठे रात्री-अपरात्री फिरायला गेली होती? मुळात स्त्रीवरील अत्याचाराचा दोष स्त्रीलाच देणे हे सामाजिक विकृतीचे लक्षण होय. माझ्या पोटातील गर्भ काढून टाका, ही स्त्री म्हणत असेल का? तो गुन्हापण पुरूषांचाच असतो. वास्तविक, एका भ्रूणहत्येत दोन स्त्रियांची हत्या होते- पोटातील स्त्रीची व दुसरी, ते भ्रूण धारण करणार्‍या त्या स्त्रीच्या मनाची. हाही एक मानसिक बलात्कार होय. कायदा करून यावर उत्तर मिळणार आहे काय?
माझं असं मत आहे की, गुन्हा करणारा व सहन करणारा हे दोन्हीही गुन्हेगार असतात. आयुष्याच्या कुठल्या वळणावर पुरुष हा हिंसक पशू झाला, कोणत्या प्रसंगाने त्याच्या मनावर हे बिंबविले की स्त्री ही एक वस्तू आहे, कोणत्या प्रसंगाने त्याच्यामधे हीन भावना आली? आज जे गुन्हेगार आहेत त्यांच्याबाबत कसलाही दयाभाव न दाखवता त्यांना कठोर शासन ताबडतोब केले पाहिजे. ते करत असताना नवीन गुन्हेगार निर्माण होणार नाहीत, याचाही विचार केला पाहिजे. तसे केले नाही तर येणार्‍या काळात जेलमध्ये गर्दीही वाढत राहील आणि समाजातील हीन प्रवृत्तीही.
शेवटी जाता जाता एक सांगावसे वाटते की, समाजातील रूढी, परंपरा, चालीरीती यापासून स्त्रीच्या प्रतिष्ठेला धोका आहे. या सर्व गोष्टी या लोकांच्या भावनेतून मोडून काढल्या पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम हाती घेऊन समाजप्रबोधन करायला हवे. पृथ्वीवर प्रत्येकाने जबाबदार पुरुष कसा निर्माण करावा, हा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे, असे मला मनापासून वाटते.
पल्लवी उधोजी
8788070416