रुपाली परागच्या भांडणांमागे हे आहे कारण

    दिनांक :14-Jun-2019
 

 
 
बिग बॉसच्या घरात ज्या दोन सदस्यांमध्ये जवळीक पाहायला मिळत होती अचानक त्यांच्यात भांडणाची ठिणगी पडली. रूपाली परागवर प्रचंड चिडली असून तिनं अबोला धरला होता. बिग बॉसच्या घरात सकाळी पराग अनेक सदस्यांना छान छान पदार्थ बनवून खायला घालत असतो. सकाळी तो सगळ्यांना ताज्या फळांचा रसही बनवून देतो. शेफ परागनं बनवलेला 'ऑरेंज ज्यूस' पराग आणि रूपालीच्या भांडणांना कारणीभूत ठरलाय. दुसऱ्या टीमसोबत भांडण असूनदेखील परागनं त्यांना ज्यूस दिला शिवाय, रूपालीला आधी न देता त्यानं तो शिवानीला नेऊन दिला याचा रूपालीला राग आला आणि ती परागवर प्रचंड चिडली. 'तुला माणसांचा प्राधान्यक्रम ठरवता येत नसेल तर मला तू बनवलेलं काहीच खायचं नाहीए. माझं जेवण बनवायला, कामं करायला मी समर्थ आहे' असं परागला बोलून झाल्यावर चिडलेली रूपाली गार्डनमध्ये जाऊन बसली. रूपाली आपल्या का चिडली आहे याचे कारण परागला समजलेच नाही. परंतु, रूपालीने किशोरी शहाणेंना पराग नेमकं काय वागला ज्यामुळे ती चिडली हे सांगितलंय. त्याने ग्रुपमधील माणसांशी असं वागणं चुकीचं आहे असंही ती म्हणाली. त्यानंतर मात्र परागनं रूपालीची जाऊन वारंवार माफी मागितली, तिची मनधरणी केली. शेवटी, रूपालीचा राग शांत झाला आणि ती ज्यूसदेखील प्यायली आणि परागशी बोलायलाही लागली.