वृत्तपत्र वाटणारी कर्तबगार माधुरी

    दिनांक :14-Jun-2019
इच्छा तिथं मार्ग, असं म्हटल्या जातं. तीव्र इच्छा असली की कोणतंही क्षितीज गाठता येतं. आपल्याला हवा तो मार्ग निवडता येतो. पाहिजे तसं यश मिळवता येतं. पुरुष असो वा स्त्री तुमच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे मग तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कुणी अडवू शकत नाही. महिलांनी आज सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. अगदी वैमानिक, रेल्वे ड्रायव्हर यापासून तर उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकर्‍या या सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज बरोबरीने काम करीत आहे. उच्च वर्गातील महिलांना तसे अनुकूल वातावरण तरी मिळत असते. म्हणूनच त्या भरारी घेण्यास सक्षम असतात. मात्र, प्रतिकूल वातावरणात पुरूषांच्या क्षेत्रात पाऊल टाकून त्यांच्या बरोबरीने काम करणार्‍या महिला फारच कमी आहेत. त्यादृष्टीने मोर्शी येथील झोपडपट्टी भागात राहणारी आदिवासी मुलगी माधुरी रामलाल कुमरे हिच्या मेहनती वृत्तीस सलामच करावा लागेल. कारण वृत्तपत्र वाटण्याचे काम करताना महिला कुठेच दिसत नाही. माधुरी हे काम चोखपणे बजावत आहे.
 
 
 
मोर्शी येथील 19 वर्षीय तरुणी माधुरी शहरातील कॉलनी परिसरात वृत्तपत्र वाटण्याचे काम करीत आहे. मोर्शी येथील वृत्तपत्र वितरक अमोल बिजवे यांच्याकडे ती पेपर वाटण्याचे काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून करीत आहे. वृत्तपत्र वाटण्याचे काम बेरोजगार मुले करीत असतात. बेरोजगार तरुणांना वृत्तपत्र वाटण्याच्या कामात रस नाही. अनेक बेरोजगार युवक एक-दोन महिने वृत्तपत्र वाटले की ते काम सोडून देतात. परिणामी वृत्तपत्र वितरकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. 21 व्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. महिला पुरुषाच्या बरोबरीत सर्व क्षेत्रात काम करीत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अन्य ठिकाणी दहा ते बारा तास काम केल्यापेक्षा वृत्तपत्र वाटण्याचे काम अल्प वेळात होते. माधुरी कुमरे हिचे चार सदस्यीय कुटुंब आहे. माधुरीने भारतीय महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. बारावीच्या परीक्षेत माधुरीने 64 टक्के गुण मिळविले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अन्य ठिकाणी ती शिक्षणासाठी जाऊ शकली नाही. माधुरीचे वडील हे गवंडी काम करीत असून लहान बहीण सतत आजारी राहात असल्याने शालेय शिक्षण पूर्ण करू शकली नाही .
 
कर्तबगार माधुरीशी संवाद साधला असता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन पायावर उभे राहण्याचा मानस तिने व्यक्त केला. मोर्शी शहरात प्रथमच महिलेने वृत्तपत्र वितरणाचे काम केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
संजय गारपवार