अर्चनभक्ती

    दिनांक :15-Jun-2019
वृषाली मानेकर
9527597412
 
परमात्म्याचा साक्षात्कार होण्यास माणसाला स्वतःमधील माणूसपणाच्या पलीकडे उडी मारावी लागते. माणसाच्या स्वभावाचा असा एक गुण आहे की, ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा सत्कार केल्याशिवाय, पूजा केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. यातच अर्चनभक्तीचे मूळ सापडते. या जगात जे जे काही उत्तम व पवित्र आहे, ते ते भगवंताला अर्पण करणे, हे अर्चनभक्तीचे प्रमुख लक्षण आहे. भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून अर्चनाचेसुद्धा स्थूल व सूक्ष्म असे प्रकार आहेत. आपली उपास्यदेवता निश्चित असावी. सद्गुरूदेखील आपले उपास्य असू शकतात. आपल्या उपास्यदेवतेची सुंदर मूर्ती किंवा तस्वीर असावी. तिला स्नान घालणे, उत्तम वस्त्र, चंदन, सुगंधी द्रव्ये, फुले वाहावी. सुग्रास नैवेद्य दाखवून आरती करावी. मनापासून साष्टांग नमस्कार करावा व प्रेमदृष्टीने एकदा तिच्याकडे बघावे. 
 
 
हे झाले प्रत्यक्ष साहित्यासह पूजन. आता आतील अर्चन कसे ते पाहा. माणसाच्या अंगी कल्पना नावाची विलक्षण शक्ती आहे. ज्ञानसाधनेत कल्पनेची मोलची मदत होते. भक्तीमध्येसुद्धा कल्पनेचा उत्तम उपयोग होऊ शकतो. आपली उपास्यदेवता आपल्या हृदयात आहे, अशी कल्पना करावी. ती मूर्ती सजीव आहे अशी कल्पना करावी. प्रत्यक्ष पूजा करताना जे जे उपचार आपण मूर्तीला-तसविरीला अर्पण करतो, ते सगळेच हृदयस्थ मूर्तीला मनाने, कल्पनेने अर्पण करावे. भगवंताचे कल्पनाचित्र रोज रंगवण्याचा प्रयत्न केला, तर मनाला सूक्ष्मात विहार करण्याची सवय लागते. भगवंत माझ्यामध्ये आहे, ही भावना साक्षात काम करू लागते, परंतु मानसपूजेत माणसाची चिकाटी हवी.
 
अर्चन म्हणजे पूजा, आपल्या उपास्यदेवतेची पूजा करणे याचे नाव अर्चन. श्रीसमर्थ मुद्दाम सांगतात की, पूजा अगदी मनापासून करावी, करायची म्हणून करू नये, पूजा म्हणजे काम नव्हे. बर्‍याचदा आपण म्हणतो, पूजा करून टाकली. नेहमी ज्या वेळेत आपण पूजा करतो त्या निर्धारित वेळेत भगवंतसुद्धा आपली वाट पाहतो. उशीर झाला तर तोही वाट पाहून निघून जात असावा. देवाची तसेच सद्गुरूची पूजा मनापासूनच करावी. बाहेरची म्हणजे प्रत्यक्ष उपचाराने व मनामध्ये म्हणजे काल्पनिक करावी. काया, वाचा, मन, चित्त, वित्त म्हणजे पैसा, जीव व प्राण ही सगळी भगवंताच्या पायी अर्पण करून अगदी मनापासून त्याची पूजा करणे यास अर्चनभक्ती म्हणतात.
 
अशाच रीतीने श्रीसद्गुरूची पूजा करून त्याच्याशी अनन्यशरणागत होणे, ‘तुमच्याशिवाय मला दुसरे कुणी नाही,’ या भावनेने त्याची पूजा करणे, ही भगवंताची खरी पूजा समजावी. बाहेरील उपचार जसे गंध-फुलं-अक्षता-धूप-दीप-अगरबत्ती हे वापरून, अशी पूजा काही कारणास्तव घडू शकली नाही तर मनाने, कल्पनेने आतमध्ये ती करावी. भगवंताची मानसपूजा होणे फार गरजेचे आहे. अगत्याचे आहे. आपण देवाला जे जे वाहावे असे वाटेल, ते ते कल्पनेने निर्माण करून त्याला वाहावे. मानसपूजा करण्याची अशी पद्धत आहे. ही पाचवी अर्चनभक्ती श्रीसमर्थांनी सांगितली
।।जय जय रघुवीर समर्थ।।