आखातातील हल्ल्यांनंतर तेलाच्या दरात वाढ

    दिनांक :15-Jun-2019
- टँकर पेटविण्यात हात नसल्याचा इराणचा दावा
ओमानच्या आखातात तेल टँकरवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला असून जगात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेलाच्या किमती ४.५ टक्के वाढल्याने तेल कंपन्यांच्या शेअरचे भावही वधारले. अमेरिकेने दिलेले व्याज दरात कपातीचे संकेतही याला कारणीभूत आहेत. ओमानचे आखात हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला असून तेल वाहतुकीचा तो एक प्रमुख मार्ग आहे. रोज १५ दशलक्ष पिंप तेलाची वाहतूक या मार्गाने होत असते. त्याशिवाय इतर पदार्थाचीही आयात होते.
 
 
पश्चिम टेक्सासमध्ये तेलाचे भाव २.२ टक्के वाढले आहेत. तर, तेल टँकरवरील हल्ल्यांमुळे तेलाच्या किमती वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे असे ब्रिटनच्या अल्फा एनर्जीचे अध्यक्ष जॉन हॉल यांनी सांगितले. युरेशिया समूहाने म्हटले आहे, की आखातातील तेल वाहतूक धोक्यात आणण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. वॉल स्ट्रीट येथे पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.
दरम्यान, ओमानच्या आखातात दोन तेल टँकर पेटवून दिल्याच्या घटनेत इराण सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप निराधार आहे, असे इराणने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले,की महिन्याभरात दुसऱ्यांदा महत्त्वाच्या सागरी मार्गात तेलटँकर पेटवून देण्याच्या घटना घडल्या असून आता हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मांडले जाईल. अमेरिका स्वत:चे व मित्र देशांचे रक्षण करण्यास सज्ज आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद झारीफ यांनी शुक्रवारी ट्विटरवर म्हटले आहे,की अमेरिकी प्रशासनाने तसूभरही पुरावा नसताना इराणवर टँकर पेटवण्यात हात असल्याचे आरोप केले आहेत. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे हे इराण दौऱ्यावर असताना अमेरिकेने घातपाती राजनीतीचा अवलंब केला आहे. इराणवर एकतर्फी र्निबध लादून अमेरिकेने आर्थिक दहशतवादच केला आहे.
इराण व अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असून युरोपीय समुदायाने यात संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर, संयुक्त राष्ट्र प्रमुख अँतोनियो गट्रेस यांनी आखातात पुन्हा युद्ध होणे जगाला परडवणारे नाही असे म्हटले आहे. जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा सुरू करण्याची केलेली सूचना हा फार्स आहे,असे इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खोमेनी यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी सांगितले, की इराण दोषी असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. एका जहाजात लिम्पेट सुरूंग न फुटलेल्या अवस्थेत दिसल्याचा दावा अमेरिकी नौदलाने केला आहे. याबाबत चत्रफीत जारी केली आहे.
हल्ला इराणनेच के ल्याचा अमेरिकेचा आरोप
ओमानच्या आखातात दोन तेल टँकरवर करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचाच हात आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. इराण व अमेरिका यांच्यात संघर्ष वाढत असतानाच तेल टँकरवर हल्ल्याच्या घटना झाल्या असून परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, अमेरिकेने या घटनांची तपासणी केली असून ओमानच्या आखातात तेल टँकरवर करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचा हात आहे यात शंका नाही.