भारतानं पाकिस्तानच्या रेल्वेला प्रवेश नाकारला

    दिनांक :15-Jun-2019
लाहोर,
'पाकिस्तानहून आलेल्या रेल्वेला भारतात येण्यापासून रोखले. तसेच २०० शीख प्रवाशांना भारतात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली', असा गंभीर आरोप पाकिस्तानने केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून रेल्वेच्या प्रवेशासाठीचा प्रस्ताव व्यवस्थित पाठवण्यात आला नाही, त्यामुळे पाकिस्तानहून आलेल्या शीख प्रवाशांच्या रेल्वेला प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाने दिली आहे.
 
 
गुरू अर्जून देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या शिखांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानहून २०० शीख भारतात येणार होते. यासाठी त्यांना व्हिसा देण्यात आला होता. हे सर्व जण पाकिस्तानच्या एका रेल्वेने शुक्रवारी भारतात पोहोचणार होते. परंतु, भारत सरकारने शीख प्रवाशांच्या पाकिस्तानी रेल्वेला आपल्या सीमेत प्रवेश नाकारला, असे इवैक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) चे प्रवक्ते आमीर हाश्मी यांनी म्हटले आहे. या प्रवाशांना भारतात प्रवेश का नाकारला, याची माहितीही भारताने दिली नाही, असा आरोप हाश्मी यांनी केला.
भारताच्या या निर्णयाचा आम्ही निषेध नोंदवला आहे. हा मुद्दा सरकारी स्तरावर उचलण्यात येईल, असेही हाश्मी यांनी सांगितले आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे पाकिस्तानमधील शीख समाजाला निराश करणारा आहे, असे पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष तारा सिंह यांनी म्हटले आहे.