जांभुळखेडा स्फोट प्रकरणी दोघांना अटक

    दिनांक :15-Jun-2019
 मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे १ मे रोजी नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोट प्रकरणाचा तपास सुरू असताना स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दिलीप श्रीराम हिडामी (२२) व परसराम मनिराम तुलावी (२८) दोघेही रा. लवारी ता. कुरखेडा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
नुकतेच नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्या तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगुंटी निर्मलाकुमारी उर्फ नर्मदाक्का उर्फ नर्मदा दिदी ५८ रा. कोडापावनुरू गलावरम मंडल जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश व तिचा पती राणी सत्थ्यनारायणा उर्फ किरण उर्फ किरणदादा (७०) रा. नरेंद्रपुरम अमलापुरम जवळ राजानगरम मंडल जिल्हा इस्ट गोदावरी आंध्रप्रदेश यांना सिरोंचा येथून अटक करण्यात आली होती. या दोघांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. यादरम्यान १ मे रोजीच्या स्फोटाची चौकशी करण्यात आली. यावेळी इतर नक्षल्यांच्या सहभागाबाबत विचारपूस करताना दिलीप हिडामी आणि परसराम तुलावी यांची नावे समोर आली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे स्फोटाच्या घटनेच्या तपासाला अधिक गती मिळणार आहे.