पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्यांची बैठक

    दिनांक :16-Jun-2019
मुंबई: उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली. तसेच या बैठकीनंतर पत्रकार परिषदेनेही आयोजन करण्यात आले होते. या शिवाय संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी विरोधीपक्ष नेत्यांच्या बैठकीत उपस्थित ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण,छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी,जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

 
 
 
संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विरोधपक्ष नेत्यांशी उद्यापासून सुरु होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजा संदर्भात चर्चा  केली. या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधी पक्षांच्या कोणत्या चर्चा व विषयांचा आग्रह आहे, त्यासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांशी बैठकीत चर्चा केली. कारण लोकशाहीप्रक्रियेमध्ये सत्ताधा-यांसोबत विरोधकांचेही तितकेचे महत्त्व आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात जनतेचे अधिकाधिक प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने विधीमंडळाचे कामकाज सुरळित चालविले गेले पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षांच्या नेत्यांना करण्यात आले.
अधिवेशनामध्ये जनतेच्या दृष्टीने चांगल्या विषयांना न्याय देण्याच्या दृष्टीने व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते चर्चेने एकत्र सोडविण्याबाबत विरोधकांनी सहमती दर्शविली. विरोधी पक्षांना सोबत घेऊनच विधीमंडळाचे कामकाज यशस्वी होत असते त्यादृष्टीने आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले असून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज नक्कीच व्यवस्थितपणे पार पडेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.