हाँगकाँग मधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित

    दिनांक :16-Jun-2019
हाँगकाँग,
हाँगकाँग मधील गुन्हेगारांना चीनच्या ताब्यात देण्याबाबतचे वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक अखेर तेथील सरकारने स्थगित केले आहे. या विधेयकाविरोधात लोकांनी जोरदार निदर्शने केली होती, तसेच तेथील संसदेवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता.

 
 
जग हाँगकाँगमधील घटनांकडे बघत आहे, असे सांगून अमेरिकेनेही डोळे वटारले होते. त्यामुळे हाँगकाँग मधील चीननियंत्रित सरकारने एक पाऊल माघारी घेतले आहे. विधेयक स्थगितीला चीननेही हिरवा कंदील दाखवला आहे. हाँगकाँग च्या चीन समर्थक नेत्या कॅरी लाम यांच्यावर हे विधेयक रद्द करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सहकारी व सल्लागारांकडून दबाव आला होता.
  
सरकारने हे घटनादुरुस्ती विधेयक स्थगित केले असून, समाजातील सर्व घटकांशी संवाद साधूनच त्यावर मार्ग काढला जाईल. समाजातील लोकांची मते यात जाणून घेतली जातील, असे लाम यांनी पत्रकारांना सांगितले.
 
या विधेयकासाठी कोणतीही मुदत ठरवण्याचा आमचा विचार नाही, त्यासाठी सल्लामसलत केली जाईल. विधिमंडळाच्या कायदा सल्लागार पथकाशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले. 1997 मध्ये हाँगकाँगचे हस्तांतरण चीनकडे करण्यात आल्यानंतरच्या काळातील सर्वात मोठी निदर्शने बुधवारी झाली होती. त्याआधी गेल्या रविवारी दहा लाख लोकांचा सहभाग असलेला मोर्चाही निघाला होता. लोकांना शांत करण्यासाठी विधेयक स्थगित करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे, असे या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, बीिंजग समर्थक शियांग यांनी सांगितले.