हृतिकचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात

    दिनांक :16-Jun-2019
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा ‘सुपर 30’ हा आगामी सिनेमाला पुन्हा एकदा वादाचे ग्रहण लागले आहे. होय, आयआयटीचे विद्यार्थी अविनाश बारो, विकास दास, मोनजीत डोले, धानीराम ताव यांनी ‘सुपर 30’चे प्रदर्शन रोखण्यासाठी कंबर कसली आहे.या विद्यार्थ्यांनी 2018 मध्ये न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. आयआयटीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिल्याचा आनंद कुमार यांचा दावा खोटा आहे, असे या जनहित याचिकेत म्हटले गेले होते. आनंद कुमार यांनी 2018 मध्ये आयआयटीत प्रवेश मिळवून दिलेल्या 26 विद्यार्थ्यांची नावे सांगावित, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली होती. आनंद कुमार यांनी अद्याप या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आता ‘सुपर 30’चे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे.
 

 
 
 
यासंदर्भात बोलताना विद्यार्थ्यांचे वकील अमित गोयल यांनी सांगितले की, ‘सुपर 30’ हा चित्रपट मुळातचं अप्रामाणिक वाटतोय. आम्हाला या चित्रपटाच्या प्रदर्शनात कुठलीही अडचण निर्माण करायची नव्हती. पण आनंद कुमार यांच्या विरोधात अद्याप केस सुरु आहे. त्यांनी अद्याप आयआयटीत प्रवेश मिळवून दिलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे सांगितलेली नाहीत. अशात या चित्रपटातून चुकीचा संदेश जावू शकतो. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, अविनाश बारो, विकास दास, मोनजीत डोल आणि धानीराम ताव एक नवी केस फाईल करून ‘सुपर 30’च्या रिलीजला स्थगिती देण्याची मागणी करू शकतात. आनंद कुमार यांच्याविरूद्धचे प्रकरण अद्याप निकाली निघालेले नाही. अशात त्यांच्यावर आधारित चित्रपट कसा प्रदर्शित होऊ शकतो, असा त्यांचा सवाल आहे.