महाराष्ट्राचा बांबूमॅन सैयद सलीम

    दिनांक :16-Jun-2019
यादव तरटे पाटील 
 9730900500
 
दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले की, जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच...! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणतात ना की, माणसेच बदल करू शकतात. समाजमनाच्या मानसिकतेवर त्यांचा मग पगडाही निर्माण होतो. कोणत्याही कामाची सुरुवात स्वत:पासून केल्यावरच हे सर्व शक्य होते. अशा कर्तृत्वाला नावीन्यपूर्ण संकल्पना व कौशल्यतेची साथ मिळाली, तर एखादी कलाकृती जन्म घेणार नाही तर नवलच! ही कथा आहे अशाच एका ध्येयवेड्या माणसाची व त्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या भारतातील पहिल्या बांबू उद्यानाची! ही कथा आहे महाराष्ट्राच्या बांबूमॅन सैयद सलीम अहमद यांची!
 
 
अमरावती शहराला लागून असलेल्या वडाळी परिसरात वन विभागाची वडाळी रोपवाटिका आहे. मात्र, वडाळी रोपवाटिका ते प्रसिद्ध बांबूउद्यान हा प्रवास थक्क करणारा आहे. अमरावती शहरालगत असलेला हा परिसर म्हणजे कुत्री व डुकरांची हक्काची जागा! इतकंच काय, तर शौकिनांचीही हक्काची पार्टी करण्याची जागा! सन 1993 मध्ये एक वनरक्षक तिथे रुजू झाला अन्‌ हळूहळू या जागेचा कायापालट व्हायला सुरवात झाली. आज त्या जागेवर फिरताना जुन्या आठवणी पुसल्यासारख्या जाणवतात. कचरा अन्‌ कचरा करणार्‍या माणसांच्या जागेत आता हिरवाई नांदत आहे. बांबूच्या बेबटांची करकर अन्‌ बांबूच्या पानांची सळसळ कानाला आणि मनाला सुखावणारी आहे. 
 
 
खरं म्हणजे कोणताही बदल एका झटक्यात होत नसतो, बांबूउद्यानही त्यातलेच एक उदाहरण म्हणता येईल. एका एका प्रजातीचे संगोपन करत तब्बल 63 प्रकारच्या प्रजातींचे संकलन आजवर येथे करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या ठरलेल्या या बांबू उद्यानात आज जगभरातील एकूण 63 प्रकारच्या बांबू-प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये भारतातील 55 व विदेशातील 8 प्रकारच्या बांबू-प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील फक्त 10 प्रजातींचा समावेश आहे. जगातील 350 प्रजातींपैकी व भारतातील 134 प्रजातींपैकी एकट्या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजातींचे संगोपन करून त्या जगविणे खरोखरच ब्रह्मप्रयत्न म्हणावे लागतील!
 
आपल्या कर्णमधुर आवाजाने कानाला भुरळ पाडणारा बासरी माहीतच आहे. ज्यापासून बासरी तयार केली जाते तो बांबू, रांगणारा बांबू, सर्वात उंच बांबू, सर्वात मोठा बांबू, काटेरी बांबू, लोणच्याचा व भाजीचा बांबू, फांदी नसलेला बांबू... असे एक ना अनेक प्रकार अगदी सुटसुटीत पद्धतीने येथे आपल्याला पाहायला मिळतात. बांबू उद्यानातील प्रत्येक प्रजातीवर शास्त्रीय नाव व माहितीचे फलक लावले असल्याने, प्रत्येक प्रजाती कशी वेगळी, हे सहज लक्षात येते. सैयद सलीम अहमद यांची चिकाटी यातून स्पष्ट होते.
 
सुपीक मनातून निर्माण झालेल्या बांबू उद्यानात प्रवेश करताच हिरवळ आपलं लक्ष वेधून घेते. नयनरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. स्वत:चे छंद बाजूला ठेवून केवळ ‘बांबू एके बांबू’चा जप करून, पोटच्या पोराप्रमाणे बांबू जपणार्‍या शेख सलीम यांचे कौतुक करावे तितके कमीच सन 1984 मध्ये मेळघाटसारख्या दुर्गम भागात रुजू होऊन सेवा देणारा हा अवलिया, पुढे इतका मोठा चमत्कार करेल अशी कुणाला कल्पनाही आली नसेल. एकीकडे लोकसेवकाला काम करण्यात मर्यादा येतात असाच समज. मात्र, या समजाला फाटा देत एका वनपालाने ही किमया केली. वडाळी रोपवाटिकेचे वनपाल सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. कोणताही बदल प्रशासकीय मानसिकता असेल तरच होऊ शकतो. सलीम यांच्या प्रयत्नांना आजवर अनेक वनाधिकार्‍यांनी साथ दिली खरी, पण काहींनी त्यांचे पायही ओढले. मात्र, तत्कालीन उपवनसंरक्षक कु. नीनू सोमराज यांच्या कार्यकाळात या कामाला सुरवात झाली. बांबू नर्सरी ते बांबू उद्यान या प्रवासाला मूर्त रूप देण्यात उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांचाही मोलाचा वाटा आहे.
 
बांबू उद्यान परिसरात आपल्याला बांबूच पाहायला मिळत नाही, तर उद्यानात असणारी सर्व खेळणीदेखील आपले लक्ष वेधून घेतात. आपल्या कल्पकतेला जोड देत सलीम यांनी एक एक कलाकृती जन्माला घातली. बांबूचा पाळणा, बांबूचा झुला, बांबूचा बोगदा, बांबूच्या झोक्यासह येथे सर्व आकर्षण आहेत. लहान मुले तर सोडाच, चक्क मोठी मंडळीदेखील येथे खेळण्यात दंग होऊन जातात! बांबू उद्यान केवळ बांबू-प्रजातींचे संगोपन करणारेच उद्यान नसून हे बांबूचे संवर्धन, संशोधन व शिक्षण या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसिद्ध समाजसेविका व अनाथांच्या माई िंसधुताई सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या आहेत. बांबू उद्यान व येथील परिसर वन्यजीव व पर्यावरणसंवर्धन मार्गदर्शन केंद्र म्हणूनही महत्त्वपूर्ण आहे.
 
बांबू उद्यान परिसरात एकूण 230 प्रकारच्या जैवविविधते अंतर्गत असलेल्या प्रजातींचे माहितीसह फलक मी विनामूल्य दिले आहेत. दि. 1 जानेवारी 2017 रोजी या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. सैयद सलीम यांच्या सुपीक डोक्यातून आलेली शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरलेली बांबू शेती व त्यावर आधारित उद्योग यावरच्या येथील कार्यशाळा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जगात बांबू उत्पादन व वापरात चीनचा पहिला क्रमांक लागतो. चीनमध्ये बांबूच्या 340 हून अधिक प्रजाती आहेत. चीनमध्ये बांबूपासून कापड, साबण, विविध गृहोपयोगी वस्तू, सरबत व इतर पेय बनविले जातात. भारताची त्या दिशेने वाटचाल सुरू झाली, तर अर्थकारणात नक्कीच सक्रिय बदल होतील. भविष्यात प्लॅस्टिक वापराला आळा घालण्याचे सामर्थ्य केवळ बांबू या एकाच गवत प्रजातीत आहे! भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रवासात बांबू हा खर्‍या अर्थाने एक मैलाचा दगड ठरू शकतो. फक्त आता त्या दृष्टीने राजकीय व प्रशासकीय प्रयत्नांची गरज असल्याचे सलीम यांना वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतच असत्तात. येणारे चढउतार हे जिवंतपणाचे लक्षणही असतात. मात्र, याच चढउताराच्या शर्यतीत सैयद सलीम यांच्यावर उपेक्षित होण्याची वेळ निसर्ग नक्कीच येऊ देणार नाही, असा विश्वास वाटतो.
 
www.yadavtartepatil.com
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.