रानडुकराचा हल्यात शेतकऱ्याचा मुलगा जखमी

    दिनांक :16-Jun-2019
 वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने नागरिक त्रस्त
वनविभागाचे दुर्लक्ष
 
आजणसरा: उन्हाची तीव्रता वाढलेली असताना सुद्धा आजणसरा परिसरातील शेतकरी सर्वत्र धूळ पेरणीत व्यस्त आहे,दुपारनंतर उन्हाची तीव्रता जास्त वाढत असल्याने शेतकरी व मजूर भल्या पहाटे पासून शेतात पेरणीसाठी जाताना दिसतात, परंतु परिसरातील  शेतकऱ्यांवर वण्य प्राण्यांच्या हल्याच्या घटनेतही वाढ झालेली असून त्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी होत आहे. या सर्वांकडे  वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे.
 
 
 
काल 15 जून रोजी आजनसरा येथील शेतकरी सुभाष रेवतकर भल्या पहाटे थाटेश्र्वर शिवारात असलेल्या शेतात पेरणीसाठी गेले होते, त्यांच्यासाठी आठव्या वर्गात शिकणारा त्यांचामुलगा यश रेवतकर सकाळी १० वाजता जेवणाचा डबा घेऊन जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या रान डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले, त्यात यश खाली कोसळला व जोरजोरात आरडा ओरड केली, त्यामुळे यशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील सुभाष रेवतकर यांनी धाव घेतली व यशला डुकराच्या तावडीतून सोडवले . रेवतकर यांचे शेत गावापासून १ किमी अंतरावर असून जवळच यशोदा नदी वाहत असल्याने बराच भाग जांगलाने व्यापला आहे, त्यामुळे रानडूकरासह अन्य जंगली प्राण्यांचा परिसरात मुक्त संचार असतो .या आधी सुद्धा आजणसरा येथील शेतकऱ्यावर रानडूकरांनी हल्ले करून गंभीर जखमी केल्याचा घटना घडल्या आहेत .यश याला गंभीर जखमी अवस्थेत वडनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, परंतु जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याचे कारण सांगून पुढील उपचारासाठी जिल्हा आरोग्य रुग्णालय वर्धा येथे हलविण्यात आले. रेवतकर हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने यशच्या पुढील उपचारासाठी वनविभागाने तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीयांसह गावकरी यांनी केली आहे