#ICCWorldCup2019 : सर्वात स्वस्त तिकिट 17 हजार रुपये, तर महागडं कितीला माहितीये?

    दिनांक :16-Jun-2019
मँचेस्टर,
भारत आणि पाकिस्तान यांची कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख आहे. यांच्यात होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्याला काही तासांमध्येच सुरूवात होणार आहे. अवघ्या जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्याचे तिकिट दर देखील गगनाला भिडलेले पहायला मिळाले. तिकिटांची विक्री सुरू होताच काही तासांमध्येच सर्व तिकीटे संपली होती. पण त्यावेळी तिकिट खरेदी केलेल्यांनी आता जास्त दराने तिकिट विक्री सुरु केली आहे.

 
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर उभय संघांमध्ये सामना रंगणार असून याची आसनक्षमता 20 हजार इतकी आहे. ब्रिटनमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये दोन्ही देशांचे नागरीक राहतात, त्यामुळे इंग्लंडमधील अनेक वेबसाईट भारत-पाक सामन्यांच्या तिकीटाची विक्री करत आहेत. वियागोगो (वियागोगो डॉट कॉम) सारख्या काही वेबसाईट्स तिकिट रिसेल करत आहेत, अर्थात तिकिटांची पुनःविक्री सुरू आहे. म्हणजे ज्यांनी आधी तिकिट खरेदी केले होते ते तिकिट येथे चढ्या दरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या संकेतस्थळानुसार त्यांच्याकडे जवळपास 480 तिकिट पुन्हा विक्रीसाठी आले, यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम तिकीटे होती.
वेबसाइटनुसार, ब्रॉन्झ आणि सिल्वर श्रेणीतील तिकिटांची विक्री पूर्ण झाली. 17 हजार रुपयांपासून 27 हजारांपर्यंत ही तिकिटं विकली गेली. रिसेल करण्यासाठी तिकिटं कुठून किती रुपयांमध्ये खरेदी केली याची माहिती वेबसाइटने दिलेली नाही मात्र कितीमध्ये विक्री केली याबाबत माहिती दिली आहे. आयोजकांनी विक्री केलेल्या किंमतीच्या कितीतरी पटीने अधिक किंमत चाहते मोजत आहेत, याची कल्पना तिकीटे विकणाऱ्या वेबसाइटने दिली आहे. आयोजकांनी विक्री केलेल्या किंमतीचा वेबसाइटवरील किंमतीशी काहीही संबंध नाही असेही त्या वेबसाइटने म्हटने आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत वेबसाइटकडे गोल्ड श्रेणीतील 58 आणि प्लॅटिनम श्रेणीतील 51 तिकिट शिल्लक राहिली होती. या तिकीटांच्या किमती त्यावेळीच तब्बल 47 ते 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. या दोन्ही श्रेणींमध्ये पाच हजार रुपयांचा फरक आहे, कारण दारु पिण्याची परवानगी असलेल्या श्रेणीतील किंमत अधिक आहे.
दरम्यान, मँचेस्टरमध्ये रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे. या पार्श्वभूमीवर स्कॉटलंड यार्डने दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना ब्लॅकने तिकीटं विकत न घेण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला तिकिटांच्या झेरॉक्स प्रती किंवा बनावट तिकिटांची विक्री होऊ शकते असे स्कॉटलंड यार्डने म्हटले आहे. भारत-पाक सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी भारतातून मोठया संख्येने क्रिकेटप्रेमी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.
ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील २५ हजार तिकिटांसाठी ६ लाख लोकांनी अर्ज केले होते. या सामन्याची बनावट तिकिट विकणारे कोण आहेत ते स्कॉटलंड यार्डने सांगितलेले नाही. पण स्टेडियम बाहेरुन तिकीटं विकत घेऊ नका असे सांगितले आहे.
प्रेक्षक, खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित आनंददायी सामना पाहता यावा यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलीस आयसीसी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत मिळून सर्व आवश्यक काळजी घेत आहेत असे पोलीस अधीक्षक ट्रीना फ्लेमिंग यांनी सांगितले. क्रिकेट स्टेडियम बाहेरुन तिकिट विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांनी सावध व्हावे.
तुम्ही विकत घेतलेली तिकिटं झेरॉक्स प्रती किंवा बनावट असू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पैसे गुन्हेगाराच्या हाती द्याल. ज्यामुळे तुम्हाला स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. काही जण अशी खोटी तिकीटे विकण्याचा प्रयत्न करत आहेत असे ट्रीना यांनी सांगितले.