#ICCWorldCup2019 : रोहित-कोहलीचा डंका; पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान

    दिनांक :16-Jun-2019

मँचेस्टर,
सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्रिशतकी मजल मारली आहे. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३३६ धावांचे लक्ष्य गाठले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला ३३७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल दिसले.
 
 
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. रोहित शर्माने तर १४० धावा फटकावत पाकिस्तानच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले.सलामीवीर लोकेश राहुलनेही यावेळी ५७ धावांची खेळी साकारली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.
दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली.
यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.