कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्य प्रमुखाचे कर्तव्यच- डॉ. मोहनजी भागवत

    दिनांक :16-Jun-2019
 तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप
नागपूर: निवडणुकीत स्पर्धा असते आणि त्यात आरोप-प्रत्यारोप होणारच. पण निवडणूक संपल्यानंतर हे सर्व थांबायला हवे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे, असा सवाल करीत लोकशाहीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे राज्य प्रमुखाचे कर्तव्य असते, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता सुनावले.
रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप रविवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया तसेच वर्गाचे सर्वाधिकारी प्रा. अनिरुद्ध देशपांडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, लोकसभा निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत स्पर्धा होतेच. लोकशाही आहे, पक्ष जिंकतात, पक्ष हरतात. स्पर्धा असल्याने अनेक गोष्टी घडतात. वातावरणात खळबळ असते. कुणी जिंकतो तर कुणी हरतो. मागील सत्ताधारी पक्ष बहुमताने पुन्हा सत्तेत आला. जनतेला या सरकारचे मागील काम पसंत आले. काही अपेक्षाही असतील. त्या पूर्ण होण्यासाठी एक संधी द्यायला हवी, अशी जनतेची इच्छा असेल. त्या लवकर पूर्ण करणे, ही या सरकारची जबाबदारीही असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
निवडणूक संपल्यानंतर आरोप-प्रत्यारोप संपून, असूया संपवून सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे व हेच देशहिताचे आहे. होळीच्या दिवशी अभद्र बोलणे आता कमी होत आहे. पण, ‘शिमगा सरला तरी कवित्व जात नाही’ या मराठी म्हणीप्रमाणे निवडणुकीनंतरचे कवित्व संपलेले नाही. निवडणुकीत चढलेले भूत अद्यापही उतरलेले नाही. असे व्हायला नको. निवडणूक संपली, विरोध संपला. देश सर्वकाळ एक आहे. भडास काढायची तरी किती. त्याला मर्यादा हवी. त्यामुळे देशाचे नुकसानच होते. पश्चिम बंगालमध्ये तरी काय सुरू आहे? देशाच्या इतर भागात असे काही होत आहे का? शासन-प्रशासनाने बंदोबस्त करायला हवा. सामान्य नागरिक नासमज असू शकतो. पण, राज्य प्रमुखाचे हे कर्तव्य आहे की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायला हवी. या कर्तव्याला चुकला त्याला राजा म्हणायचे?, असा सवाल त्यांनी केला.
लोकशाहीत जनतेच्या इच्छेनुसार व्यवहार हवा. जनतेने इच्छा जाहीर केली आहे. मतांच्या स्वार्थासाठी एकीकडे गोडगोड बोलायचे, एकात्मतेचा आव आणायचा तर दुसरीकडे आपल्याच समाजात भांडणे लावून त्यावर राजकीय पोळ्या शेकायचे उद्योग याआधी झाले. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. बाहेरचे लोक आले, त्यांना येथे रहायचे का, अशीही भाषा होती. भारत देश प्रगतिपथावर असून त्याचे स्थान त्याला मिळू नये, यासाठी जगात अनेक शक्ती चहूकडे आहेत. भारत देश पुन्हा पारतंत्र्यात नेण्याची संधी त्यांना मिळू नये, याचे भान राखायला हवे. भारत बलवान झाल्यानेच जगातील स्वार्थाची दुकाने बंद होत आहेत. शस्त्र व अर्थ बळावर दादागिरी करणारे देशही आता भारतासोबत राहण्याची भाषा करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली तेव्हाच सावध केले होते. आपसातील भांडणामुळेच देश पारतंत्र्यात गेला. विविधतेत एकता मानणे ही आपली राष्ट्रीय प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्य, समतेसाठी बंधुभाव गरजेचा आहे. हीच राष्ट्रीय प्रवृत्ती संविधानात व्यक्त झाली आहे. संघही हा आपलेपणा, बंधुभाव जागवतो, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
प्रारंभी संघ शिक्षा वर्गातील शिक्षार्थ्यांनी दंड, नियुद्धाची प्रात्यक्षिके सादर केली. घोष पथकाने विविध रचना सादर करीत सांघिक वादनाचा परिचय दिला. बासरीच्या धूनवर विविध योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. ‘युग परिवर्तन की बेला में हम सब मिलकर साथ चले’ तसेच ‘जाग उठा है आज देश का सोया अभिमान’ आदी गीते स्वयंसेवकांनी सादर केली. वर्गाचे सर्वाधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी वर्गाचा आढावा सादर केला. राजेश लोया यांनी अतिथींचा परिचय करून दिला.
मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामशंकर कथेरिया, दिल्लीच्या चाणक्य आयएस अकॅडमीचे संचालक ए. के. मिश्रा, त्रिपुराचे चित्तरंजन महाराज, भारताचे माजी राजदूत रमेशचंद्र, युवा संशोधक यशराज व युवराज, इन्फोसिस कंपनीचे माजी प्रमुख डॉ. कृष्णास्वामी, उद्योजक पचिपाला दोरास्वामी, हासन वासजी ढेम्पो गोवा आदी मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते.